परराज्यातून आलेल्या स्थलांतरित समुदायाला लसीकरण नकोसे

115

गोवंडीखालोखाल कुर्ला पश्चिमेत गोवरबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या भागात काजूपाड्यात आतापर्यंत ८ रुग्णांना गोवरची बाधा झाली. वर्षाच्या सुरुवातीलाही गोवरचे दोन रुग्ण काजूपाड्यात आढळले होते. काजूपाड्यात परराज्यातून आलेल्या स्थलांतरित समुदायाने आरोग्यसेविका आणि आरोग्य कर्मचा-यांना लसीकरणास ठाम नकार दिला आहे. बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये मूळ वास्तव्य असलेल्या या स्थलांतरित समूदायाला समजवायचे तरी कसे, असा प्रश्न सर्वांसमोर आहे.

( हेही वाचा : गोवरमधून बरे झाल्यानंतरच्या मरणयातना, काही बालकांना पुन्हा करावे लागतेय रुग्णालयात दाखल)

दैनंदिन कामकाजावर घर चालणावारा हा समूदाय सध्या काजूपाडा नजीकच्या संजयनगर, अशोकनगर आणि सुंदरबाग भागांत वास्तव्याला आहे. या भागांत गोवरबाधित रुग्ण आढळल्यानंतर आरोग्यसेविकांनी लसीकरणासाठी या भागांत आपला मोर्चा वळवला. वस्तीत राहणा-या या समुदायाच्या लहानशा झोपड्यात दोनहून अधिक मुले एकाच घरात राहत आहेत. एकाला लागण झाल्यास इतरांनाही गोवर होण्याची भीती आहे. आम्ही गेल्या आठवड्यापासून वस्तीपातळीवर या भागांत फिरायला सुरुवात केली. मात्र आम्हांला पाहून थेट दरवाजा बंद करणे, अर्वाच्य भाषा वापरणे हे सर्रास घडून येत असल्याची माहिती आरोग्यसेविकांनी दिली. या भागांत कित्येकदा महिलांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न उद्भवू शकतो म्हणून एकटी महिला कोणत्याही वस्तीत शक्यतो जात नाही. निदान मुलांना घराबाहेर जाऊ देऊ नका, अशी विनंती आम्ही बंद दरवाज्याबाहेरच करुन परततो, असेही त्या म्हणाल्या.

तब्बल आठवड्याभराच्या प्रयत्नानंतर गुरुवारनंतर आता या समुदायाकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. निदान मुलांना घराबाहेर पाठवणे लोकांनी आता बंद केल्याची माहिती आरोग्य सेविका आणि आरोग्य कर्मचा-यांकडून मिळाली. सध्या एल वॉर्डात १५७ संशयित रुग्ण आहेत. हे सर्व संशयित रुग्ण स्थलांतरित वस्त्यांमध्ये आढळत आहेत. त्यामुळे लोकांनी बालकांना लसीकरणासाठी पालिका दवाखाने किंवा लसीकरण केंद्रात आणण्याची आवश्यकता असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले. गुरुवारी वस्तीपातळीवरील काही केंद्रात लोकांनी मुलांना लसीकरणासाठी आणण्यासाठी थोडीफार सुरुवात केल्याचे दिसून आले. हे चित्र मोठ्या प्रमाणात सकारात्मक पातळीवर बदलेल, अशी आशा डॉक्टरांना आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.