मुंबईत उभे राहणार लष्करी संग्रहालय! ‘ही’ असणार वैशिष्ट्ये

भारतीय लष्कराच्या सामर्थ्यासोबत नागरिकांना एक समृद्ध असा अनुभव मिळेल अशी व्यवस्था याठिकाणी असावी, असे मुख्यमंत्री म्हणाले.

97

भारतीय लष्कराच्या गौरवशाली आणि अभिमानास्पद कामगिरीचे दर्शन घडवणारे, शौर्य, पराक्रम, धैर्य आणि संयमाच्या काळातील अनुभूतीची प्रचिती देणारे राज्य युद्ध स्मारक आणि लष्कर संग्रहालय मुंबईत उभारण्यात येणार असून, या संग्रहालयासाठी तातडीने जागा निश्चित करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने या संग्रहालयाचे काम वेगाने पूर्णत्वाला नेऊन, येत्या १५ ऑगस्टपर्यंत यातील काही भाग नागरिकांसाठी सुरू करावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

(हेही वाचाः महाभारत आणि अर्थशास्त्राचे धडे लवकरच लष्करातही गिरवले जाणार?)

सैन्याच्या प्रात्यक्षिकांचा प्रत्यक्ष अनुभव

हे संग्रहालय कसे असावे, यात कोणकोणत्या बाबींचा समावेश असावा हे निश्चित करण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांच्या सहभागासह एका सल्लागार आणि डिझाईनर समितीची स्थापना करण्यात यावी, तसेच बंकर कसे असतात, सियाचीनसारख्या ठिकाणी उणे डिग्री सेल्सीयसमध्ये आपले सैनिक कसे राहातात, जड शस्त्रास्त्रे सोबत घेऊन आपले सैनिक वाळवंटातून कसे चालतात, जंगलात त्यांचा वावर कसा असतो, यासारख्या गोष्टींची माहिती आणि अनुभव संग्रहालयाला भेट देणाऱ्या नागरिकांना मिळावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

लष्कराचे सामर्थ्य दर्शवणारी अनुभूती मिळावी

देशाचे लष्करी  सामर्थ्य आणि गौरव दर्शवणाऱ्या या  संग्रहालयाच्या माध्यमातून तिन्ही सैन्य दलाच्या पराक्रमाच्या यशोगाथा, विविध युद्धांची माहिती, त्यात वापरण्यात आलेली शस्त्रास्त्रे आणि आयुध यांसह तिन्ही सैन्य दलामध्ये सहभागी असलेले महाराष्ट्रातील सैनिक, अधिकारी यांच्या पराक्रमाची माहिती, विविध युद्धांत सहभागी होऊन हुतात्मा झालेले राज्यातील सैनिक-अधिकारी, टँक, नौका, विमाने, पदके, लष्करी गणवेश, लष्करातील पदाधिकाऱ्यांचे रँक स्ट्रक्चर यांसारख्या बाबी प्रदर्शित करण्यात याव्यात.

(हेही वाचाः भारतीय जवानाची अशीही कामगिरी! गिनीज बुकमध्ये नोंद)

युद्धात उपयोगात येणारी विमाने, नौका, हेलिकॉप्टर्स, रणगाडे यांच्या उभारणीसह इतर बाबींच्या प्रतिकृती येथे असाव्यात. येथे भारतीय स्वातंत्र्याची सर्व ऐतिहासिक माहिती मिळावी, हे राज्य संग्रहालय होत असल्याने यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करी कौशल्यांची माहिती, त्यांचे नौदल नियोजन याची माहिती देणारे दालन असावे. ॲम्फी थिएटर, नागरी सुविधा, परमवीरचक्र, अशोक चक्र विजेत्यांची माहिती त्यांचा पराक्रम, त्यांचे मेडल्स अशी सर्व माहिती याठिकाणी मिळावी, असेही मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे.

युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रात्यक्षिके

याठिकाणी एक ॲक्टीव्हिटी एरियाही तयार केला जावा. युवावर्गाला शारीरिक सुदृढतेसाठी काय करायला हवे, किमान सुरक्षिततेसाठी काय केले पाहिजे याची माहिती आणि मार्गदर्शन येथे मिळावे. भारतीय लष्करात सहभागी होण्यासाठी युवकांना प्रेरणा मिळावी यादृष्टीने त्यांना यासाठी करावयाची तयारी, याचे प्रात्यक्षिक ज्ञान देणारे काही कोर्सेस सुरू करता येतील का याचाही विचार केला जावा. एकूणच भारतीय लष्कराच्या सामर्थ्याची सर्वंकष माहिती मिळताना या माध्यमातून नागरिकांना एक समृद्ध असा अनुभव मिळेल अशी व्यवस्था याठिकाणी असावी, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

(हेही वाचाः महाराष्ट्रातील मनोज गुंजल ठरला राष्ट्रीय सेवा पुरस्काराचा मानकरी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.