गेल्या काही दिवसांपूर्वी इंधन, गॅस दर वाढीनंतर आता दुधाचे दर वाढले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसणार असल्याचे दिसतेय. महानंद, चितळे, गोवर्धन, कात्रज दुधाच्या खरेदीत तीन रुपये तर विक्री दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दूध पावडर व बटरचे वाढलेले दर, वाढती मागणी व कमी उत्पादन, पशुखाद्य, इंधन दरवाढीमुळे दूध व्यवसाय करणे शेतकऱ्यांना अडचणीचे ठरत असल्याने दूध व्यावसायिकांच्या दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाने दूध खरेदी दरामध्ये ३ रुपयांची, तर दूध विक्री दरामध्ये २ रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना ३ रुपयांचा फायदा होईल; तर सर्वसामान्य ग्राहकांना २ रुपयांचा भुर्दंड बसणार आहे.
प्रति लिटर दूधामागे दोन रुपये अधिक होणार खर्च
त्यामुळे ग्राहकांना प्रति लिटर दूधामागे आता दोन रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. दरम्यान, राज्यातील सहकारी व खासगी दूध उत्पादक संघांकडून एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की, शेतकऱ्यांकडून जे दूध संघ दूध खरेदी करतात त्या शेतकऱ्यांना तीन रुपये प्रतिलिटर वाढवून देण्यात येणार आहे. या नव्या निर्णयामुळे आता गाईच्या दुधाचा खरेदीदर प्रतिलिटर ३३ रुपये तर, पिशवीबंद दुधाचा किरकोळ विक्री दर प्रतिलिटर ५२ रुपये असणार आहे.
(हेही वाचा – आज काश्मीर जळतोय, उद्या देश जळेल! ‘त्या’ ९२ आमदारांनी काय मांडली व्यथा? वाचा)
यामुळे वाढले दूधाचे दर
या दूध दरवाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी १५ मार्चपासून करण्यात आली असल्याची माहिती मिळतेय. महानंद, चितळे, गोवर्धन, कात्रज इत्यादी सहकारी व खासगी दूधव्यावसायिकांचे प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित होते. तर कात्रज डेअरीचे कार्यकारी संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, वीज, पॅकेजिंग, लॉजिस्टिक आणि चारा यांच्या वाढत्या किंमतीमुळे ही दूधाचे दरवाढ करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community