आदित्य ठाकरेंना वाटते सर्व पक्षांनी एकत्र यावे… का ते जाणून घ्या

वातावरण बदल तीव्र होत असून त्याचा सामना सर्वच देशांना करावा लागत आहे. अशा स्थितीत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन शाश्वत विकासासाठी एकदिलाने काम केले पाहिजे, असे आवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. वातावरण बदल सक्षमतेसाठी चळवळ उभी करताना त्यात महिलांचे नेतृत्व उभे करण्यासाठीही आपण करार केला आहे, ही समाधानाची बाब असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे.

तीन नवीन उपक्रम

बदलत्या वातावरणाशी जुळवून घेत पर्यावरण संवर्धन व संरक्षण करण्याच्या दृष्टिने मुंबई वातावरण कृती आराखडा बनवण्याची कार्यवाही वेगाने सुरू आहे. मुंबई वातावरण कृती आराखड्यामध्ये महत्त्वाचे ठरणारे तीन नवीन उपक्रम राज्य पर्यावरण व वातावरण बदल विभागाच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहेत. वुमन फॉर क्लायमेट, सिटीज फॉर फॉरेस्टस् कॅम्पेन आणि ई-बस मिशन असे हे तीन उपक्रम असून या तिन्ही उपक्रमांच्या सामंजस्य करारांवर सोमवारी महापालिका मुख्यालयातील समिती सभागृहात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

(हेही वाचाः इलेक्ट्रिक वाहन निर्मितीसाठी मंत्री आदित्य ठाकरेंचा पुढाकार)

त्यावेळी अध्यक्षस्थानी असलेल्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रगतीशील व त्यासोबत पर्यावरणस्नेही मुंबई महानगर घडवण्याच्या दिशेने वेगाने पावले टाकली जात असून, त्यामध्ये आज स्वाक्षरी करण्यात आलेले तिन्ही सामंजस्य करार हे महत्त्वाचे आहेत.

२०२८ पर्यंत बेस्ट बस इलेक्ट्रीक

मुंबईतील बेस्ट उपक्रमामध्ये यापुढे दाखल होणारी प्रत्येक बस ही इलेक्ट्रीक असेल. सन २०२८ पर्यंत संपूर्ण बेस्ट बस ताफा इलेक्ट्रीक असेल, असा मानस व्यक्त करुन बेस्टच्या डबल डेकर बसेस या इलेक्ट्रीक किंवा हायड्रोजन फ्युएल सेल यापैकी जास्त सक्षम असेल. त्या ऊर्जेआधारे धावताना दिसतील, असेही ठाकरे यांनी नमूद केले.

(हेही वाचाः पूर्व उपनगरवासियांना मुलुंडला हवे आरटीओ कार्यालय)

नागरी वनीकरणासाठी प्रयत्न

मुंबई महापालिकेने पर्यावरणाचे भान राखून त्याचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी याआधीच निरनिराळ्या उपायांची अंमलबजावणी केली आहे. कचऱ्याचे ओला-सुका वर्गीकरण, माझी वसुंधरा अभियान अंतर्गत नागरी वनीकरणाचा भाग म्हणून मागील दीड वर्षभरात लावलेली सुमारे अडीच लाख झाडे असे उपक्रम त्यात समाविष्ट आहेत. त्यापुढे जाऊन आता पर्जन्य जल संवर्धन करण्यासाठी गृहनिर्माण संस्था, शासकीय कार्यालये परिसर व शक्य तिथे शोषखड्डे करुन त्यात पाणी मुरवले पाहिजे. वाहतूक बेटं, उड्डाण पुलांखालील जागा, मैदानांभोवती कुंपण स्वरुपात याप्रमाणे झाडांची लागवड केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here