एससीएलआर पूल दुर्घटनेची चौकशी करण्याचे शिंदेंचे आदेश

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

144

वांद्रे-कुर्ला संकुल ते जेव्हीएलआरला जोडणाऱ्या पुलाच्या गर्डर कोसळून झालेल्या दुर्घटनेची त्रयस्थ मूल्यमापन संस्था आणि एमएमआरडीएचे अधिकारी मिळून चौकशी करतील, अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच या घटनेत जखमी झालेल्या कामगारांच्या उपचाराचा खर्च एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शुक्रवारी झाली दुर्घटना

शुक्रवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास वांद्रे-कुर्ला संकुल आणि जेव्हीएलआरला जोडणा-या निर्माणाधीन पुलाचा गर्डर अचानक एका बाजूला कलंडल्याने त्यात 14 कामगार जखमी झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

(हेही वाचाः धक्कादायक! बीकेसीकडील निर्माणाधीन उड्डाणपूल कोसळला! )

मूल्यमापन करण्याचे आदेश

यावेळी बोलताना त्यांनी झालेली ही दुर्घटना पूर्णपणे दुर्दैवी असून, या दुर्घटनेला जो कुणी जबाबदार असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले. ही दुर्घटना गर्डरचे बेअरिंग आणि नट बोल्ट यांच्यात त्रुटी राहिल्याने झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले, तरीही त्याची पूर्ण चौकशी करुन त्यानंतरच दोषींवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अशी दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी नवीन तयार होत असलेल्या पुलांचे मूल्यमापनही त्रयस्थ मूल्यमापन संस्थेकडून करण्याचे निर्देश शिंदे यांनी एमएमआरडीए आयुक्तांना दिले आहेत.

जखमी कामगाराची रुग्णालयात भेट

या दुर्घटनेत किरकोळ जखमी झालेल्या 13 कामगारांना उपचार करुन रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. तर केवळ एक कामगार डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार घेत होता. एकनाथ शिंदे यांनी स्वतः व्ही.एन. देसाई  रुग्णालयात जाऊन या कामगाराची विचारपूस केली. तसेच त्याच्यावर नीट उपचार करण्याच्या सूचना डॉक्टरांना दिल्या. यावेळी एमएमआरडीए आयुक्त व्ही श्रीनिवास राव, स्थानिक पोलिस अधिकारी, एमएमआरडीएचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

(हेही वाचाः एसटीचे चालक देशात अव्वल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.