राज्यभरात परिवहन विभागाच्या मालकीच्या जमिनींवर झालेले अतिक्रमण तातडीने हटवून त्या जागा अतिक्रमणमुक्त कराव्यात, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिले आहेत. ते आज परिवहन आयुक्त कार्यालयात आयोजित विभागीय आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीस परिवहन आयुक्त विवेक भीमनवार (Vivek Bhimanwar) यांच्यासह विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत बोलताना मंत्री सरनाईक (Pratap Sarnaik) म्हणाले की, “राज्यभरातील अनेक ठिकाणी परिवहन विभागाच्या मालकीची जमीन असून, त्या जमिनींवर अनेक वर्षांपासून अनधिकृत अतिक्रमण झालेले आहे. या जमिनींवर स्थानिक अधिकाऱ्यांनी तातडीने सर्वेक्षण करून कारवाई करावी. अतिक्रमण हटवून त्या जमिनींवर कुंपण भिंत उभारावी व विभागाच्या नावाचा फलक लावावा, तसेच भविष्यात पुन्हा अतिक्रमण होणार नाही यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी.”
(हेही वाचा – Manoj Kumar Passes Away : देशप्रेमाची भावना रुजवणारा महान अभिनेता चित्रपटसृष्टीने गमावला!)
जमिनींच्या सुरक्षेबरोबरच विविध सुधारणा योजनांवर चर्चा
या बैठकीत विभागाच्या विविध प्रशासनिक विषयांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये:
- अधिकाऱ्यांच्या कार्याचे मूल्यमापन
- अकार्यकारी पदांची निर्मिती
- वायु वेग पथकाचा दैनंदिन अहवाल मागवणे
- मोटार वाहन अधिकाऱ्यांच्या पदनामानुसार जबाबदारी निश्चित करणे
- विधी व सल्लागार पदाची निर्मिती
- महसूल वाढवण्यासाठी उपाययोजना
या महत्त्वाच्या विषयांचा समावेश होता. मंत्री सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी अधिकाऱ्यांना या बाबतीत कार्यवाहीचा तपशीलवार आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले.
(हेही वाचा – Delhi-NCR मध्ये एका वर्षासाठी फटाके वाजवण्यास बंदी; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय)
परिवहन विभागातील बदल्यांमध्ये पारदर्शकता सुनिश्चित करा – सरनाईक
बैठकीदरम्यान परिवहन विभागातील बदल्यांबाबत पारदर्शकतेचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. सन २०२३ पासून बदल्या या ऑनलाईन पद्धतीने पार पाडल्या जात आहेत, हे नमूद करताना मंत्री सरनाईक (Pratap Sarnaik) म्हणाले की, “मानवी हस्तक्षेप टाळून ऑनलाइन प्रणालीद्वारे बदल्या पारदर्शक झाल्या आहेत. यामध्ये आणखी सुधारणा करून पुढील बदल्या अधिक पारदर्शक व कार्यक्षम व्हाव्यात.”
ते पुढे म्हणाले, “फक्त अधिकाऱ्यांच्याच नव्हे, तर लिपिक पदांवरच्या बदल्याही या अॅपद्वारे पार पडाव्यात, यासाठीही आवश्यक ती तांत्रिक सुधारणा केली जावी.”
या बैठकीत विभागाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, विभागीय कामकाज अधिक गतिमान व पारदर्शक होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community