कोविड-19च्या वाढत्या रुग्णसंख्येचे व्यवस्थापन करण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून केंद्रीय आयुष मंत्रालयाने आज कोविड व्यवस्थापनासाठी प्रशिक्षित आयुष डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याविषयीचे दिशानिर्देश जारी केले आहेत. यामुळे सुमारे 8 लाख प्रशिक्षित डॉक्टर कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती आयुष मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
कोविड लढ्यासाठी मोठे वैद्यकीय मनुष्यबळ
कोविड व्यवस्थापनासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढवण्याच्या दृष्टीने घेण्यात येत असलेल्या विविध निर्णयांच्या मालिकेतील हा ही एक निर्णय आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने एनइइटी(NEET) पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलून डॉक्टरांना कोविड सेवेत शंभर दिवस पूर्ण केल्यावर, सरकारी नोकर भरतीत प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना त्यांच्या प्राध्यापकांच्या देखरेखीखाली कोविड व्यवस्थापन सेवेत नियुक्त करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयांमुळे कोविड लढ्यासाठी मोठे वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.
Advisory issued for induction of trained AYUSH human resources for clinical management of #COVID19
A pool of 8 lakh qualified #AYUSH professionals to become available for COVID- 19 duties@moayush
Read here: https://t.co/ILRiE4hsyb
— PIB India (@PIB_India) May 7, 2021
आयुष डॉक्टरांची फौज
आयुष डॉक्टर्स हे विविध संस्थांमध्ये प्रशिक्षण घेतलेले व्यावसायिक असतात. तसेच वैद्यकीय शुश्रुषेच्या विविध पैलूंची त्यांना माहिती असते. देशभरात विविध संस्थांमध्ये कोविड व्यवस्थापनाची भूमिका सक्षमपणे पार पाडत, त्यांनी आपली कार्यक्षमता आधीच सिद्ध केली आहे. आयुष मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या काही संस्था कोविड केअर सेंटर म्हणून कोविड रुग्णांवर उपचार करत आहेत. तसेच राज्य/केंद्रशासित प्रदेशांनी 1.06 लाख आयुष व्यावसायिकांना कोविड व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले असून, 28 हजार 473 व्यावसायिक कोविड सेवेत आहेत. केंद्र सरकारच्या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमातून आयुषच्या 66 हजार 45 व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याशिवाय आयुष आणि आरोग्य मंत्रालयाने संयुक्तपणे 33 हजार आयुष प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे.
याचाच अर्थ विविध माध्यमांतून आयुष व्यावसायिकांना कोविडविरुध्दच्या लढ्यासाठी प्रशिक्षित आणि सज्ज करण्यात आले आहे. आयुष मंत्रालयाच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून सुमारे 8.32 लाख आयुष मनुष्यबळाची माहिती संकलित करण्यात आली असून, ती कोविड वॉरियर्स पोर्टल covidwarriors.gobv.in येथे उपलब्ध आहे.
Join Our WhatsApp Community