कसा वापर कराल “आयुष-64”चा? आयुष मंत्रालयाने दिली उत्तरे

या औषधाच्या वैद्यकीय चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर केल्यानंतर, औषधासंदर्भात विचारल्या जाणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे प्रसिध्द करण्यात आली आहेत.

आयुष-64 हे बहु-वनौषधी औषध मूलतः हिवतापावरील उपचारासाठी 1980 मध्ये विकसित करण्यात आले होते, पण आता या औषधाचा उपयोग कोविड-19 वरील उपचारासाठी उपयुक्त ठरत असल्याने, या महामारीच्या संकटात तज्ञांनी या औषधाला आशेचा किरण म्हटले आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद तसेच इतर संशोधन संस्था आणि वैद्यकीय महाविद्यालयांच्या संयुक्त सहकार्याने केलेल्या या औषधाच्या सखोल आणि कठोर वैद्यकीय चाचण्यांचा निष्कर्ष नुकताच जाहीर झाला आहे.

मान्यताप्राप्त संशोधकांनी केलेल्या या चाचण्यांतून हे औषध सौम्य तसेच, मध्यम स्वरुपाच्या कोविड-19 संसर्गावरील उपचारासाठी उपयुक्त ठरत असल्याचे दिसून आले. म्हणून कोविड-19 आजारावरील उपचारांमध्ये या औषधाचा समावेश करण्यात आला आहे. या औषधाच्या वैद्यकीय चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर केल्यानंतर सामान्य जनता आणि वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये देखील या औषधाविषयी मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली आहे. या विषयासंदर्भात विचारल्या जाणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे प्रसिध्द करण्यात आली आहेत.

आयुष-64 म्हणजे नेमके काय आहे?

आयुष-64 या औषधाच्या प्रयोगशाळेत केलेल्या चाचण्या असे दाखवितात की, त्याच्या 36 पैकी 35 घटकांमध्ये कोविड-19 विषाणूला बंदिस्त करू शकणारे तीव्र आसक्तीकारक गुणधर्म आहेत. आयुर्वेदिक औषधांचे हे विशिष्ट प्रमाणातील आयुर्वेदिक संयुग फ्ल्यूसारख्या आजारांमध्ये देखील अत्यंत विश्वसनीय परिणाम साधते. भारतभर झालेल्या 6 वैद्यकीय अभ्यासातून मिळालेल्या शास्त्रीय पुराव्यांतून असे सिद्ध झाले आहे की लक्षणविरहित, सौम्य आणि मध्यम स्वरुपाच्या कोविड-19 आजाराच्या व्यवस्थापनात रुग्णाचे वैद्यकीय स्वास्थ्य आणि जीवनाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने आयुष-64 या औषधात प्रमाणित उपचारांमध्ये आनुषंगिक मदत करण्याची क्षमता आहे.

(हेही वाचाः सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्यांसाठी ‘आयुष-६४’चे वरदान!)

आयुष-64 ह्या औषधाचे सेवन कोण करू शकते?

कोविड-19च्या कोणत्याही टप्प्यावरील रुग्ण हे औषध घेऊ शकतो. ज्या रुग्णांना तातडीच्या वैद्यकीय मदतीची किंवा रुग्णालयात उपचार घेण्याची आवश्यकता नाही, असेच रुग्ण हे औषध घेण्यासाठी पात्र आहेत. या औषधाचा उत्तम उपयोग होण्यासाठी, सौम्य ते मध्यम स्वरुपाचा संसर्ग झालेले आणि ताप, कणकण, अंगदुखी, नाक चोंदणे, नाकातून स्त्राव वाहणे, डोकेदुखी, खोकला, इत्यादी लक्षणे असणारे कोविड-19 आजाराचे रुग्ण, तसेच आजाराची कोणतीही लक्षणे नसणारे कोविड-19 बाधित यांची RT-PCR चाचणीद्वारे आजाराची निश्चिती झाल्यानंतर, हे रुग्ण 7 दिवसांच्या आत हे औषध सुरु करू शकतात.

मी आयुष-64 हे औषध का घ्यावे?

आयुष -64 हे औषध आजाराची लक्षणे आणि तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने रोगातून बरे होण्याचा वेग मोठ्या प्रमाणात वाढवते असे दिसून आले आहे. सामान्य आरोग्य, थकवा, अस्वस्थता, ताण, भूक लागणे, सामान्य स्वास्थ्य आणि झोपेच्या बाबतीत देखील या औषधाचे अत्यंत लाभदायी परिणाम होतात.

कोविड-19 रुग्णांनी कसा घ्यावा डोस?

लक्षणविरहित कोविड-19 रुग्णांनी आयुष-64 औषध (500 मिलीग्राम)च्या 2 गोळ्या दिवसातून दोनदा जेवणानंतर कोमट पाण्यासोबत 14 दिवस घ्यायच्या आहेत. तर सौम्य किंवा मध्यम स्वरुपाची लक्षणे असलेल्या रूग्णांनी 500 मिलीग्राम आयुष-64 च्या दोन गोळ्या दिवसातून तीनदा जेवण/आहारानंतर कोमट पाण्यासोबत 14 दिवस घ्यायच्या आहेत.

(हेही वाचाः आता अमित देशमुख घेणार आयुषच्या डॉक्टरांची मदत)

आयुष-64 चे काही दुष्परिणाम होतात का?

काही रुग्णांना हगवणीचा त्रास होऊ शकतो. मात्र, हा त्रास मर्यादित स्वरुपाचा असून त्यासाठी कुठल्याही वैद्यकीय उपचारांची गरज नाही.

सौम्य स्वरुपाची लक्षणे असलेल्या रूग्णांसाठी हे एकमेव औषध आहे का?

असे समजायला हरकत नाही. सौम्य स्वरुपाची लक्षणे आढळल्यास आयुर्वेदिक डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली, या रुग्णांवर पूर्ण उपचार करण्यात येतील. मात्र, त्यासाठी कायम सल्ला आणि सूचना देण्यासाठी डॉक्टर उपलब्ध असणे गरजेचे आहे. आयुष-64 चे डोस गृह-अलगीकरणात असणा-या कोविड रुग्णांनी आपल्या सौम्य ते मध्यम स्वरुपाची लक्षणे दिसल्यावर, त्या अनुरुपच घेणे योग्य ठरेल. आयुष-64 चा वापर केवळ अधिकृत आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करणे योग्य ठरेल.

आयुष-64 औषध किती दिवस घ्यावे लागेल?

आयुष-64 च्या गोळ्या कमीतकमी 14 दिवस तरी घ्यायला हव्यात. जर गरज पडली तर आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, हे औषध 12 आठवडे घेतले जाऊ शकते. हे औषध 12 आठवडे घेणे सुरक्षित असल्याचे, शास्त्रीयदृष्ट्या सिध्द झाले आहे.

आयुष-64 चा वापर कसा करवा ?

याचे सेवन कोमट पाण्यासोबत केले जावे. जेवणानंतर एक तासाने हे औषध घेणे अधिक योग्य ठरेल.

(हेही वाचाः राज्याचा रिकव्हरी रेट देशापेक्षा जास्त)

सहव्याधी असणा-या कोविड रुग्णाला आयुष-64 घेता येईल का?

ज्या रुग्णांना उच्च रक्तचाप, मधुमेह आहे, अशा रुग्णांनी जर त्यांना लक्षणविरहित, त्यासोबच सौम्य किंवा मध्यम स्वरुपाचा कोविड असेल तर त्यांनीही आयुष-64 घ्यावे. तसेच आपली आधीची औषधे देखील सुरुच ठेवावीत.

लसीकरणानंतर आयुष-64 औषध घेणे योग्य आहे का?

होय. जर व्यक्तीला लसीकरणानंतर संसर्ग झाला, तर त्याने आरटी-पीसीआर चाचणी करुन कोविड झाल्यानंतरच्या सात दिवसांत हे औषध सुरु करावे. मात्र त्याआधी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेतला जावा. याबाबतच्या लाभांचे शास्त्रीय पुरवावे अद्याप उपलब्ध झालेले नाहीत.

आयुष-64 गर्भवती महिला आणि स्तनदा मातांसाठी सुरक्षित आहे का?

गर्भवती महिला आणि स्तनदा मातांसाठी औषध-64 सुरक्षित असल्याबाबतचे कोणतेही शास्त्रीय पुरावे उपलब्ध नाहीत.

(हेही वाचाः ‘ऑनलाईन’ व्यवहार करताना ‘फसवणूक’ कशी टाळाल? वाचा सविस्तर माहिती)

आयुष-64 हे औषध बाजारात उपलब्ध आहे का?

होय. हे औषध बाजारात उपलब्ध आहे आणि आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात ते उपलब्धही आहे. मात्र आयुर्वेदिक डॉक्टरांच्या चिठ्ठीविला त्याची थेट दुकानातून खरेदी करुन, वापर करू नये. तसेच, डॉक्टरांच्या देखरेखीशिवाय ते घेणेही अयोग्य ठरेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here