ट्रेनमधून जास्त वजनाचे सामान नेताना खरंच दंड भरावा लागणार? हे आहे रेल्वे मंत्रालयाचे स्पष्टीकरण

रेल्वेने आपल्या लगेज पॉलिसीमध्ये बदल केले असून, त्यानुसार आता प्रवाशांना ट्रेनच्या प्रवासात ठराविक वजनापेक्षा जास्त सामान घेऊन जाण्यासाठी, जास्त किंमत मोजावी लागणार असल्याचे वृत्त गेले काही दिवस सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमधून व्हायरल होत आहे.

त्यामुळे रेल्वेच्या प्रवासाला आता विमानाचे नियम लागू करण्यात आल्याचे बोलले जात होते. पण याबाबत आता केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. रेल्वेने आपल्या Luggage Policy मध्ये कुठलाही बदल केला नसल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

(हेही वाचाः नोटांवरील गांधींचा फोटो हटवणार? RBI ने केला मोठा खुलासा)

रेल्वे मंत्रालयाचे स्पष्टीकरण

रेल्वेकडून लगेज पॉलिसीमध्ये बदल करण्यात आल्याच्या बातम्या, गेले काही दिवस सोशल मीडिया आणि काही न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. पण भारतीय रेल्वेकडून अशाप्रकारचे कुठलेही आदेश देण्यात आलेले नसून, सामानाची ने-आण करण्यासाठी जे नियम लागू आहेत ते दहा वर्षांपेक्षा जास्त काळापासून लागू आहे, असे स्पष्टीकरण रेल्वे मंत्रालयाने ट्वीटच्या माध्यमातून दिले आहे. त्यामुळे सध्या व्हायरल होत असलेल्या या बातम्या या केवळ अफवा असून त्यावर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.

(हेही वाचाः Mumbai-Ahemadabad Bullet Train: कधी धावणार देशातील पहिली बुलेट ट्रेन, रेल्वेमंत्र्यांनी दिली माहिती)

काय होती अफवा?

रेल्वेच्या नव्या नियमानुसार, स्लिपर कोचमधील प्रवाशांना 40 किलो, एसी टू टीयर कोचमधून 50 किलो, तर फर्स्ट क्लास एसीमधून सर्वात जास्त 70 किलो वजनाचे सामान नेण्याची मुभा आहे. पण यापेक्षा जास्त वजनाचे सामान नेणारा प्रवासी आढळला तर त्याला बॅगेज रेटच्या सहा पट अधिक दंड आकारला जाणार आहे, अशी माहिती देण्यात येत होती. पण हा नियम जुना असल्याचे आता रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here