राज्य लसीकरणात आघाडीवर आहे, अशा बातम्या आल्या खऱ्या, मात्र पहिला डोस घेण्यात ही आघाडी असल्याचे सामोर आले आहे. खरे लसीकरण दुसरा डोस झाल्याशिवाय होत नाही, असा नियम आहे आणि यात महाराष्ट्र बराच मागे आहे. कारण तब्बल ७४ लाख ९४ हजार लोकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. त्यांचे लसीकरण करणे हे आता मोठे आव्हान राज्य सरकारच्या समोर उभे राहिले आहे.
घरीच लस घेऊन येणार!
जेव्हा कोरोना जोरात होता, तेव्हा लोकांनी घाबरून लसीकरण केंद्राकडे धाव घेतली. त्यावेळी लसी कमी पडल्या. आता कोरोना बऱ्यापैकी ओसरला आहे, तर लसीकरण केंद्रे ओस पडली आहेत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे राज्य सरकारचा लसीकरण विभाग हा दुसरा डोस घेण्याचे राहून गेलेल्यांची जिल्ह्यानिहाय यादी बनवणार आहे. त्यानंतर त्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी थेट त्यांच्या दारातच लस घेऊन जाणार आहे. १ नोव्हेंबरपर्यंत राज्यात कोविशील्डचा दुसरा डोस न घेतलेल्यांची संख्या ही ५९ लाख ६७ हजार होती, तर कोवॅक्सीन लसीचा दुसरा डोस न घेतलेल्यांची संख्या १५ लाख २७ हजार इतकी असल्याचे सामोर आली आहे.
(हेही वाचा : पेन्शनधारकांना खुशखबर! घरी बसून द्या हयातीचे प्रमाणपत्र!)
केंद्राने दिली अनुमती
आधीच केंद्राने रुग्णशय्येवर असलेले, अपंग आणि अतिवृद्ध यांचे घरी जाऊन लसीकरण करण्यास परवानगी दिलेली आहे. त्याच धर्तीवर दुसऱ्या डोसच्या लसीकरणासाठी या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लस दिल्यावर ३० मिनिटे निरीक्षणाखाली ठेवण्याची कार्यपद्धत आहे, त्याचे तंतोतंत पालन करण्यात येणार आहे. यासंबंधीची नियमावली बनवण्यासाठी अजून ३-४ दिवस लागतील, असे सांगितले जात आहे. याआधी राज्य सरकारने शाळा, महाविद्यालये, मैदान येथे सामूहिक लसीकरणाचे प्रयोग केले, मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता.
Join Our WhatsApp Community