शहराच्या पालकमंत्र्यांनाही आठवले ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई अभियान’

162

मुंबई महानगराचा कायापालट करण्यासाठी १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान माझी मुंबई, स्वच्छ मुंबई या विशेष अभियानाची अंमलबजावणी करायची आहे. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रं येणं महत्वाचं आहे. या अभियानामध्ये सर्व भागधारकांनी सहभागी व्हावे आणि सर्व मुंबईकरांना देखील सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करावे,असे आवाहन करत शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या अभियानाची अखेर घोषणा केली.

27 दिवसांनंतर घोषणा

उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी २ नोव्हेंबर रोजी घोषणा केली होती आणि त्याच्या दोन दिवस आधी शहराच्या पालकमंत्र्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली होती. पण केसरकर यांना कल्पना नव्हती, की लोढा यांनी त्यांना या अभियानाची कल्पना दिली नाही,अशी शंका उपस्थित होत होती. पण आता या अभियानाची घोषणा शहराचे पालकमंत्री केसरकर यांनी २७ दिवसानंतर केली.

(हेही वाचाः उपनगर गलिच्छ आणि शहर स्वच्छ ? : केवळ अर्ध्या मुंबईत राबवली जाणार स्वच्छता मोहिम)

भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांची युती असताना दोघांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद किंवा महापालिका आणि जिल्हाधिकारी यांची बैठक बोलावून त्यात ही घोषणा करणे आवश्यक असताना या दोन्ही मंत्र्यांनी स्वतंत्रपणे या अभियानाची घोषणा करून आपले दोघांचे मार्ग आणि ध्येय वेगवेगळी असल्याचे दाखवून दिले आहे.

मुंबई महानगरात १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान माझी मुंबई, स्वच्छ मुंबई हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीमध्ये भागधारकांचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या निर्देशानुसार बैठक आयोजित केली होती.

(हेही वाचाः आता ‘या’ कामांसाठी Birth Certificate अनिवार्य होणार, केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय)

केसरकरांची सूचना

विशेष म्हणजे या बैठकीला काँग्रेसचे आमदार अमीन पटेल हे उपस्थित असले तरीही बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार सदा सरवणकर, यामिनी जाधव, भाजपचे कालिदास कोळंबकर, तमिल सेलवन, हे मात्र उपस्थित नव्हते. यावेळी बोलतांना, माझी मुंबई स्वच्छ मुंबई हे अभियान मुंबई महानगराचा कायापालट करण्यासाठी राबवावयाचे आहे. अभियानामध्ये बक्षीस मिळो ना मिळो, मात्र त्यानंतर सर्वांनी एकदिलाने मुंबईच्या स्वच्छतेसाठी कृती करावी, यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करावयाचे आहेत, असे उद्गार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी काढले.

मोहिमेत सहभागी होण्यासाठी आवाहन

स्वच्छता राखणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. या मोहिमेतून विजेत्यांना बक्षीस मिळेलच, मात्र बक्षिसानंतरही अभियान न थांबवता त्याचा कायमस्वरुपी अंगीकार होण्यासाठी प्रयत्न करणे, हा खरा उद्देश आहे. त्या दिशेने सर्वांनी मिळून काम करुया, असे आवाहन केसरकर यांनी केले. आपल्याला फक्त स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई नाहीच तर स्वस्थ मुंबई सुद्धा करायची आहे, ही आमची जबाबदारी आहे. मुंबईचे गतवैभव आपल्याला मिळवून द्यायचे आहे.
आपण ठरवले तर सर्व मिळून काहीही करू शकतो. लोकांना आपण काहीतरी प्रोत्साहन दिले तर लोक कचरा विलगीकरण काम करायला तयार होतील, असे सांगत सर्वांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केसरकर यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.