ठाण्यातील मनसे पदाधिकारी जमील शेख यांची दुचाकीवरुन गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले. संबंधित आरोपीला लखनऊच्या स्पेशल टास्क फोर्सने अटक केली. या आरोपीचे नाव इरफान सोनू शेख मनसुरी असे असून यानेच दुचाकीवर मागे बसून जमील शेख यांच्यावर गोळी झाडली होती. आरोपी मनसुरीला लखनऊ कोर्टातून ठाणे गुन्हे शाखा युनिट 1 च्या ताब्यात दिले जाणार आहे. आरोपीला सोमवारी, 5 एप्रिल रोजी ठाणे कोर्टात हजर केले जाणार आहे
काय आहे हे प्रकरण?
मनसे पदाधिकारी जमील शेख यांची 23 नोव्हेंबर 2020 रोजी दुचाकीवर आलेल्या दोघांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. ठाण्याच्या राबोडी परिसरात संबंधित घटना घडली होती. राबोडी येथे त्यांच्या दुचाकीजवळ त्यांचा मृतदेह आढळला होता. त्यावेळी तेथील स्थानिकांनी दुचाकीचा अपघात झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असा दावा केला होता. पण पोलिसांनी याप्रकराची सखोल चौकशी केली असता त्यांची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले. पोलिसांनी राबोडी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा जमील शेख यांच्या दुचाकीमागे आणखी एक दुचाकी त्यांचा पाठलाग करत असल्याचे दिसून आले. तसेच या दुचाकीवरील दोघे जणांनी संधी मिळताच शेख यांच्यावर गोळी झाडली. त्यानंतर मोठ्या शिताफीने तेथून धूम ठोकली. संबंधित सर्व प्रकार सीसीटीव्हीत अचूकपणे कैद झाला होता. याच सीसीटीव्हीच्या आधारावर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत एका आरोपीला दोन दिवसात बेड्या ठोकल्या होत्या.
(हेही वाचा : कोरोना काळात इमारत, सोसायट्यांनी कोणती घ्यावी काळजी? वाचा महापालिकेच्या सूचना!)
2 लाखांच्या सुपारीसाठी खून
ठाणे पोलिसांच्या युनिट 1 गुन्हे शाखेने 25 नोव्हेंबर 2020 रोजी पहिला आरोपी ठाण्यातील राबोडी येथून अटक केला होता. या आरोपीचे नाव शाहिद शेख असे आहे. तो सध्या ठाणे जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. तर दुसऱ्याला आरोपीला आता लखनऊ येथून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अजून पोलिसांच्या हाती आलेला नाही. मुख्य आरोपीने अटक केलेल्या आरोपींना दोन लाखांची सुपारी दिली होती.
Join Our WhatsApp Community