मुंबईतील खड्ड्यांबाबत रान उठलेले असतानाच मनसेने खड्ड्यांच्या नित्कृष्ट दर्जाच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित करत महापालिका प्रशासनाला इशारा दिला आहे. शनिवारी रात्री बुजवलेल्या खड्ड्यांची डांबरमिश्रित खडी पुन्हा उखडू लागल्याने मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सोशल माध्यमाद्वारे प्रशासनाची अशाप्रकारे खड्डे बुजवण्याची पध्दत कोणती, असा सवाल केला आहे. प्रशासन जर जबाबदारीने काम करणार नसेल तर यापुढे केल्या जाणाऱ्या मनसे स्टाईल आंदोलनाला प्रशासन जबाबदार असेल, असाही इशारा त्यांनी दिला.
(हेही वाचाः सभागृह नेत्यांच्याच प्रभागात फूटपाथ उखडलेले)
प्रशासनाच्या कामाची पोलखोल
दादर पश्चिम येथील सेनापती बापट यांच्या पूर्णाकृती पुतळ्या शेजारील गॅस गल्ली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने मनसेचे स्थानिक शाखाध्यक्ष संतोष साळी यांनी महापालिका जी-उत्तर विभागात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार, शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हे खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले. परंतु रविवारी रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये टाकलेले डांबर निखळून गेले आहे. याबाबत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी फेसबूक लाईव्हद्वारे बुजवलेल्या खड्ड्यांच्या नित्कृष्ट कामाची पोलखोल केली आहे.
नगरसेवक झोपा काढत्यात का? pic.twitter.com/DauQogmEqK
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 10, 2021
(हेही वाचाः दादरच्या ‘त्या’ तीन रोडच्या फूटपाथकडे दुर्लक्ष का?)
मनसेचा सवाल
शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी पाऊस पडलेला नसतानाही खड्ड्यांमधील डांबर निघाले कसे, असा सवाल करत महापालिकेच्यावतीने बुजवल्या जाणाऱ्या खड्ड्यांच्या नित्कृष्ट दर्जाच्या कामाचे हे उदाहरण असल्याचे देशपांडे यांनी सांगितले. महापालिकेच्या सहायक आयुक्त आणि अभियंत्यांनी जे खड्डे भरले आहेत त्याची ‘एसओपी’ काय आहे, असा सवालही त्यांनी केला.
(हेही वाचाः दादासाहेब फाळके मार्गाच्या फुटपाथवरुन कसे चालाल?)
तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल
खड्डे बुजवण्याचा आजवरचा अनुभव पाहता, आम्ही आजही हात जोडून आपल्याला विनंती करत आहोत की कामाचा दर्जा सुधारा. कामाचा दर्जा न सुधारल्यास त्याविरोधात मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. महापालिकेचे अधिकारी जर स्वत:ची जबाबदारी नीट सांभाळत नसतील, तर आम्हालाही रस्त्यावर उतरावे लागेल आणि त्यानंतर जे काही होईल याची जबाबदारी आपली असेल, असाही इशारा त्यांनी दिला आहे.
(हेही वाचाः प्रिन्सेस स्ट्रीट, दवा बाजार, लोहार चाळीत चाला पण स्त्यावरुन)
Join Our WhatsApp Community