सुशांत सावंत
राज्यात कोरोनाच्या संकटामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतर प्रवाशांना लोकलचा प्रवास बंद आहे. यामुळे सर्वसामान्य चाकरमान्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याचसाठी मनसेने सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा सुरु करावी याकरता सविनय कायदेभंग आंदोलन छेडले होते. पोलिसांनी मनसेला आंदोलन करू नका यासाठी नोटीस पाठवली तरी देखील नोटीसीचे उल्लंघन करत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी अन्य तीन कार्यकर्त्यांसह कर्जत ते शेलू पर्यंत लोकलने प्रवास केला. याचा व्हिडिओ देखील त्यांनी व्हायरल केला. याचमुळे देशपांडे यांच्यासह तीन कार्यकर्त्यांना रेल्वे पोलिसांनी अटक केली.
१५ हजारांच्या जामीनावर सुटका
संदीप देशापांडे आणि त्यांच्यासह तिघांना कल्याणच्या रेल्वे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने प्रथम त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर देशपांडे यांच्या वकिलांनाने जामीनासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने पंधरा हजाराच्या जामीनावर देशपांडे यांची सुटका केली.
संदिप देशपांडे,गजानन काळे,संताेष धुरी,
अतुल भगत यांना जामीन मंजूर..
कल्याण रेल्वे काेर्टातून सुटका…जनतेच्या सेवेसाठी,मनसेचा लढा सुरु राहणार..
केसेस ला आम्ही घाबरत नाही…
सर्व महाराष्ट्र सैनिकांच्या प्रेमाबद्दल मनापासून आभार..🙏-गजानन काळे साेशल मिडीया टीम- pic.twitter.com/FaWxpP5Hbm
— Gajanan Kale MNS (@GajananKaleMNS) September 22, 2020
मुंबईत पोलिसांना गुंगार, कर्जत-शेलू दरम्यान सापडले
विशेष म्हणजे रविवारी सकाळी मुंबईत रेल्वे पोलिसांना गुंगारा देत संदीप देशपांडे, सरचिटणीस गजानन काळे, अतुल भगत यांच्यासह मनसे नेत्यांनी लोकल ट्रेनने प्रवास केला. मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ठिक-ठिकाणच्या रेल्वे स्थानकाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता मात्र तरी देखील संदीप देशपांडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी लोकलने प्रवास करत आंदोलन यशस्वी करून दाखवले. मात्र कर्जत ते शेलू प्रवासादरम्यान त्यांच्यावर कारावाई करण्यात आली. तर ठाणे स्टेशनवर अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात असल्याचे दिसत आहे.
सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केली असून, आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न सरकार यातून करत आहे. मात्र सरकारच्या अशा कोणत्याही धाकदपटशहाला आम्ही बळी पडणार नाही, मनसैनिक त्याला अजिबात घाबरणार नाही. आम्ही जे केले ते लोकांसाठी केले आहे. तसेच सरकार डोक्यावर बंदूक ठेवून आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही सामान्य जनतेसाठी भांडत असून, सरकारला याप्रकरणी निर्णय घ्यावाच आहे, अशी प्रतिक्रिया मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली.
Join Our WhatsApp Community