-
प्रतिनिधी
“मराठी माणसात जागतिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, पण त्यासाठीची खिडकी मराठी भाषेची असावी!” असे मत मांडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी (Marathi) भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून भव्य पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर २७ फेब्रुवारीपासून ते २ मार्चपर्यंत हे प्रदर्शन भरवले जाणार आहे.
मराठी साहित्याचे सर्वात मोठे प्रदर्शन!
राज ठाकरे यांनी “हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे पुस्तक प्रदर्शन असेल,” असा विश्वास व्यक्त केला आहे. “आपल्या मराठी (Marathi) भाषेने केवळ साहित्यिक नव्हे, तर वैचारिक क्रांती घडवली आहे. ही परंपरा पुढे नेण्यासाठी आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे पुस्तक प्रदर्शन एक संधी ठरेल,” असे ते म्हणाले.
(हेही वाचा – Marathi Sahitya Sammelan 2025: ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन)
हिंदी-इंग्रजी प्रभाव आणि मराठी भाषेचे भविष्य
राज ठाकरे यांनी मराठी (Marathi) भाषेच्या वाढत्या दुर्लक्षिततेवर चिंता व्यक्त करत म्हटले, “आज दोन मराठी माणसंही हिंदी किंवा इंग्रजीत बोलताना दिसतात. हे का होतंय, हेच कळत नाही. मराठी उत्तम साहित्याची भाषा आहे आणि ती आता ज्ञानाची भाषा देखील बनली आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “जगभरातील उत्तमोत्तम पुस्तकं आता मराठीत अनुवादित होत आहेत. त्यामुळे बदलत्या जगाचे भान मराठीतूनही सहज मिळू शकते. ही समज पुढच्या पिढीत रुजवली पाहिजे, तरच मराठी भाषेत आणखी लेखक आणि विचारवंत घडतील.”
१७ मान्यवरांकडून कवितावाचन – एक अनोखा अनुभव!
या पुस्तक प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे उद्घाटन समारंभात १७ नामवंत व्यक्तिमत्त्वे त्यांच्या आवडीच्या मराठी कविता सादर करणार आहेत. “इतक्या मान्यवरांच्या तोंडून थेट मराठी (Marathi) कविता ऐकण्याचा हा एक अनोखा अनुभव असेल,” असे राज ठाकरे म्हणाले.
(हेही वाचा – राज्यात Cyber Crime ची संख्या वाढली; २०१६ ते २०२४ पर्यंतचा आकडा आला समोर)
मराठी भाषेचा गौरव साजरा करूया!
राज ठाकरे यांनी “या पुस्तक प्रदर्शनाला आपल्या कुटुंबासह भेट द्या आणि आपल्या भाषेचा गौरव साजरा करा,” असे आवाहन केले आहे. “मराठी (Marathi) भाषा ही आपली ओळखच नाही, तर आपली शक्ती आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण तिची महती पुन्हा अनुभवूया!” असे ते म्हणाले. २७ फेब्रुवारी ते २ मार्च २०२५ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज मैदान, मुंबई येथे आयोजित करण्यात आले असून मराठी भाषा आणि साहित्यप्रेमींसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community