सुशांत सावंत
रेल्वे…मुंबईची लाईफ-लाईन अशी तिची ओळख. पण मागील कित्येक महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी ही लाईफलाईन मात्र बंद आहे. राज्यात कोरोनाचे संकट आले आणि सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लाईफ-लाईन असलेली लोकल मात्र बंद झाली. आताही ज्या लोकलच्या फेऱ्या सुरु आहेत त्यामध्ये फक्त आत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्यांनाच प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे बाकीच्या प्रवाशांना कामवार जाण्यासाठी आटापीटा करावा लागत आहे. याचमुळे आता राज ठाकरे यांचा मनसे पक्ष लोकल सरु करण्यात यावी यासाठी सोमवारी जन आंदोलन करणार आहे. मात्र मुंबईत कोरोनाबाधित रुग्नांची वाढलेली संख्या पाहता लोकल सुरु करणे कितपत योग्य आहे, असाही मतप्रवाह निर्माण झाला आहे.
मनसेचे खळ्ळ खट्याक
आज सर्वसामान्य जनतेला कामावर जाताना त्रास सहन करावा लागतो. बसमध्ये गेले तरी गर्दी, रस्त्यावरुन गेले तरी गर्दी, हा गर्दीचा त्रास जर वाचवायचा असेल तर लोकल गाड्या सुरु कराव्यात. पण घरात बसून जे सरकार चालवत आहेत, त्यांना याची काहीच काळजी नाही. त्यासाठी मनसेतर्फे २१ सप्टेंबरला आम्ही लोकलने प्रवास करणार आहोत. जनतेच्या हितासाठी मनसेचा रेल्वे प्रवास, असे मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि मनसे नेते संतोष धुरी यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना सांगितले.
कार्यालयीन वेळा बदलण्याची मागणी
लोकलमधील गर्दी कमी व्हावी तसेच दिवसेंदिवस वाढत जाणारा कोरोना व्हायरसचा त्रास कमी व्हावा यासाठी मुंबईतील ऑफिसेसच्या वेळांमध्ये बदल करण्यात यावा, अशी मागणी उपनगरीय प्रवाशी वाहतूक संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. सध्या सर्वसामान्यांना लोकलने प्रवास करता येत नाही. परंतु, लवकरच सर्वांसाठी लोकल सेवा सुरू झाल्यास पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे लोकल सुरू करण्यापूर्वी प्रशासनाने मुंबईतील ऑफीसेसच्या वेळा बदलाव्यात. यामुळे गर्दी कमी होण्यास मदत होईल आणि कोरोनाचा वाढत जाणारा प्रादुर्भाव थांबेल. यासोबतच ऑफिसच्या वेळा गाठण्यासाठी नोकरदारांची होणारी दमछाक देखील थांबेल, अशी प्रतिक्रिया रेल्वे प्रवासी संघाचे माजी अध्यक्ष मनोहर शेलार यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार देखील केला आहे. जर मागणी मान्य नाही झाली तर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार असेल असे देखील मनोहर शेलार यांनी म्हटले आहे.
राज्य सरकार आत्मनिर्भर कधी होणार?
मनसेचे आंदोलन हे लोकांसाठी आहे. पण जर सर्वसामन्यांसाठी लोकल सुरु झाली तर मात्र कोरोनाचे संकट अधिक वाढेल. लोकलने जवळपास ८० लाख प्रवासी रोज प्रवास करत असतात. त्यामुळे आता लोकल सुरु केल्यास खूप मोठी हानी होऊ शकते. मात्र जर राज्य सरकारने लोकल शिवाय इतर ट्रान्सपोर्ट सर्वसामन्यांसाठी वाढवली तर तोडगा निघू शकतो. आपण किती दिवस लोकलवर अवलंबून राहायचे राज्य सरकारने आत्मनिर्भर व्हायला हवे असे मत रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी मांडले. तसेच जर सर्वसामन्यांसाठी लोकल सुरुच करायची असेल तर ती क्रमश: सुरु करायली हवे असे देखील ते म्हणालेत.
सर्वसामान्यांना हवीय लोकल
पश्चिम रेल्वेवरील वसई-विरार, नालासोपारा, तर मध्य रेल्वेवरील ठाणे आणि त्यापुढील डोंबिवली, अंबरनाथ, कल्याण, बदलापूर, कसारा, कर्जत अशा भागात राहणाऱ्या नागरिकांची ऑफिस गाठताना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत असून, सर्वसामान्य नागरिकांना देखील लोकल सुरु व्हावी असे वाटते. सर्वसामन्यांना गर्दीने भरलेल्या बसमधून पाच ते सहा तास प्रवास करुन कार्यालय गाठावे लागत आहे. त्यामुळे अनेक प्रवासी संघटनांनी देखील मनसेच्या आंदोलनाला पत्राद्वारे पाठिंबा दिला आहे.