पुणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने सुरु केलेल्या फिरत्या पशु चिकित्सालयाच्या १० मोबाईल वाहनांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी लोकार्पण केले. फिरते पशु चिकित्सालय सुरू करणारी पुणे ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे, अशी माहिती यावेळी आयुष कुमार प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बाबुराव वायकर यांनी दिली.
पशु चिकित्सालय फिरती वाहने
पशु चिकित्सालय फिरती वाहने जीपीएस प्रणालीवर दिसतील याची काळजी घेण्याच्या सूचना यावेळी अजित पवार यांनी दिल्या. त्यांनी वाहनातील विविध सुविधांविषयी माहिती घेतली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पशुंना वेळेत आणि परवडणाऱ्या दरात उपचार योग्य पद्धतीने मिळावेत, असेही त्यांनी सांगितले. ‘१९६२’ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क केल्यास या मोबाईल वाहनांद्वारे ठरलेल्या गावातील शेतकऱ्यांना सेवा मिळणार आहे. तज्ञ शासकीय पशुवैद्यक या वाहनात असणार आहे. अन्य उपचारांसोबतच अवघड शस्त्रक्रियाही या फिरत्या वाहनात होणार आहे. ५० रुपये इतके माफक शुल्क असणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, महिला व बालकल्याण समिती सभापती पूजा पारगे, समाजकल्याण समिती सभापती सारिका पानसरे आदी उपस्थित होते.
( हेही वाचा : बेस्ट प्रवाशांचे हाल! काय आहे कारण? )
या कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, निमंत्रितांची भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे आयुक्त सुहास दिवसे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतारे यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community