देशात कोरोनाचा ताप उतरत असताना आता मंकीपॉक्स आजाराने टेन्शन वाढवायला सुरुवात केली आहे. केरळमधील कुन्नूर जिल्ह्यात मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे आता याबाबत केंद्र सरकार सतर्क झाले आहे. मंकीपॉक्सचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने आता उपाययोजना करायला सुरुवात केली असून, परदेशातून येणा-या प्रवाशांची आता विमानतळावर तपासणी केली जाणार आहे. तसेच भारतातील सर्व बंदरांवर देखील परदेशातून येणा-या प्रवाशांची तपासणी होणार आहे.
बाहेरगावाहून येणा-या प्रवाशांची तपासणी
केरळमध्ये गेल्या आठवड्यात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर सोमवारी मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळला. आरोग्य मंत्रालयाकडून विमानतळ आरोग्य कर्मचा-यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये आरोग्य अधिका-यांनी मंकीपॉक्स ओळखण्यासाठी आणि उपचारांसाठी माहिती दिली. परदेशातून येणा-या नागरिकांची तपासणी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देखील करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता विमानतळे, बंदरे याठिकाणी बाहेरगावाहून येणा-या प्रवाशांची तपासणी होणार आहे.
(हेही वाचाः ‘गेट वे ऑफ इंडिया’वर कार्यक्रमांसाठी मोजावे लागणार इतके पैसे)
देशात दोन रुग्ण
देशात मंकीपॉक्सचे दोन्ही रुग्ण हे केरळात आढळून आले आहेत. पहिला 35 वर्षीय रुग्ण 13 जुलै रोजी तर दुसरा 31 वर्षीय रुग्ण 18 जुलै रोजी आढळऊन आला आहे. हे दोन्ही रुग्ण आखाती देशातून भारतात आल्याची माहिती मिळत आहे.
Join Our WhatsApp Community