राज्यात जवळपास सर्वच भागात पोहोचलेले नैऋत्य मोसमी वारे विकेंडला विदर्भात पोहोचणार आहेत. शुक्रवारपासून विदर्भात सलगचार दिवस पावसाची संततधार होईल तर सोमवारी दक्षिण कोकणात अतिवृष्टी होईल. चार दिवसांसाठी विदर्भाला येलो अलर्ट तर सोमवारसाठी दक्षिण कोकणाला ऑरेंज अलर्ट मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे.
शुक्रवारी विदर्भ वगळता राज्यात पावसाच्या चांगल्या कामगिरीची शक्यता नाही. मुंबईतही पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. मात्र गुरुवारच्या पावसामुळे कमाल तापमान सांताक्रूझ आणि कुलाब्यात दोन्ही ठिकाणी 31अंशावर येईल. अगोदरच किमान तापमान खाली सरकलेले असल्याने तापमानातील उतार शुक्रवारीही कायम राहील. मुंबईसह ठाण्यात आणि रायगडमध्ये आता थेट शनिवारी – रविवारी मुसळधार सरी कोसळतील. पालघरमध्ये सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात शनिवारपासून पावसाला जोर येईल. विकेंडला मुसळधार सरीनंतर सोमवारी दोन्ही जिल्ह्यात अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर, मध्य तसेच पश्चिम महाराष्ट्रात येत्या दिवसांत हलका पाऊसच राहील. कोल्हापूर आणि साताऱ्यात सोमवारी मुसळधार सरींची शक्यता असल्याने, येलो अलर्ट मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे.
रविवारपासून सलग दोन दिवस दक्षिण महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीजवळील समुद्रात ताशी 40-50 ते 60 किलोमीटर प्रतीवेगाने वारे वाहतील. सोमवारी उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ताशी 40-50 ते 60 किलोमीटर प्रतीवेगाने वारे वाहणार आहेत. या दिवसांत मच्छिमारांनी संबंधित समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे.