राज्यात उशिरा दाखल झालेला मान्सून जुलैच्या अखेरीस जोरदार बरसल्याने सर्वत्र पूरपरिस्थिती ओढावली होती. पण आता दोन दिवस पावसाचा जोर ओसरल्याचे पाहायला मिळते. अशात हवामान खात्याकडून पुढच्या काही दिवसांत राज्याला पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रातील पश्चिमेकडील वारे बळकट झाल्याने राज्यात पावसाचा जोर असेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
पुढील ३ दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या लगतच्या घाटांवर चांगला पाऊस होईल. यामुळे शेतीच्या कामाला आणखी वेग येणार आहे. अशात महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात आणि उर्वरित हंगामात पाऊस सरासरीखाली राहण्याची शक्यता अधिक असल्याचे या अंदाजात म्हटले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ऑगस्ट महिना तसेच उर्वरित मान्सून हंगामातील पावसाचा दीर्घकालीन अंदाज ‘आयएमडी’चे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी जाहीर केला. डॉ. महापात्रा म्हणाले, ‘देशभरात ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांत पावसाचे प्रमाण पूर्वार्धापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये देशभरातील पाऊस त्या महिन्याच्या सरासरीपेक्षा कमी राहू शकतो. या काळात महाराष्ट्रासह मध्य भारतातील पावसाचे प्रमाण कमी होईल, तर दुसरीकडे गंगेच्या खोऱ्यातील राज्यांमध्ये आणि हिमालयातील पावसाचे प्रमाण वाढेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community