देशभरात सध्या वरुणराजाने कृपादृष्टी बरसवल्याने ठिकठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. देशाच्या विविध भागांतील मुसळधार पावसाची दखल घेत भारतीय हवामान खात्याने बुधवारी सकाळी बुलेटीनच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक राजधानीत मुंबईत सकाळी साडेअकरावाजेपर्यंत पाणी साठून पूरजन्य परिस्थिती निर्माण होणार असल्याचा इशारा दिला आहे. संपूर्ण कोकणात बुधवारी पूरजन्य परिस्थिती दिसून येईल, असे भारतीय हवामान खात्याने बुलेटीनच्या माध्यमातून जाहीर केले.
गुजरात राज्यात पावसाने धुमाकूळ घातल्याने, जनजीवनावर गेल्या तीन दिवसांपासून परिणाम दिसून येत आहे. गुजरातसह राज्यातील कोकण, मराठवाडा आणि मध्य प्रदेशातील काही भागांतही पावसाची संततधार सुरु आहे. देशातील उर्वरित भागांपैकी उत्तराखंड, महाराष्ट्राला लागून असलेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगढ, कर्नाटक, तेलंगणा या राज्यातही पावसाच्या मा-याने ठिकठिकाणी पाणी साचल्याने स्थानिकांना पूराचा सामना करावा लागत आहे. या भागांत आजही पूराची स्थिती कायम राहील, असे बुलेटीनच्या माध्यमातून भारतीय खात्याने स्पष्ट केले.
( हेही वाचा: वाढत्या पावसात ‘लॅप्टो’चे रुग्ण वाढण्याची भीती )
या जिल्ह्यांत पूरजन्य परिस्थिती
सकाळी साडेअकरापर्यंत राज्यातील मराठवाडा भागातील नांदेड, परभणी, उस्मानाबाद, लातूर आणि बीड या जिल्ह्यांत तर विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतही पूरजन्यस्थिती दिसून येईल. त्याखालोखाल गेल्या तीन दिवसांपासून पालघर आणि नाशिकला झोडपणा-या पावसाचा प्रभाव गुरुवारपासून संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि कोल्हापूरात सक्रीय होईल. परिणामी कोकणातील पालघरसह ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही पाण्याची पातळी वाढलेली दिसून येईल. मध्य महाराष्ट्रातील नाशिकसह, अहमदनगर, पुणे आणि कोल्हापूरातही हीच परिस्थिती कायम राहील, असे भारतीय हवामान खात्याच्यावतीने सांगण्यात आले.
Join Our WhatsApp Community