गेल्या दोन दिवसांपासून सायंकाळनंतर जोर धरणाऱ्या पावसाने बुधवारी मुंबईला चांगलेच झोडपले. सकाळपासून दुपारी चारवाजेपर्यंत मुंबईत पावसाची संततधार कायम होती. एरव्ही मध्ये ब्रेक घेत बरसणारा पाऊस बुधवारी सतत बरसत होता. त्यामुळे ओलेचिंब रस्ते, थोडी विलंबाने धावणारी लोकल यातच मुंबईकरांचा अर्धा दिवस सरला.
सतत हलक्या सरी कोसळत असल्याने छत्री, रेनकोटसह घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. सकाळी साडेआठ वाजल्यापासून ते दुपारी चार वाजेपर्यंत वांद्रे येथे 57 मिमी, विद्याविहार येथे 48.5 मिमी पाऊस झाला. तर दक्षिण मुंबईत जोरदार बरसलेल्या पावसाने भायखळ्यात 74.5 मिमी, महालक्ष्मी परिसरात 67 मिमी तर माटुंग्यात 70.5 मिमी पावसाची नोंद केली. मुंबईत ताशी 55 किमी वेगाने वारे वाहत असल्याने, मुंबईतील बहुतांश भागात गारवाही होता.
( हेही वाचा: ४८ तासांमध्ये मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे पूर्ववत करा; महापालिकेकडे भाजपने केली मागणी )