पावसाने रस्ते जलमय, वाहतूक झाली विस्कळीत

126
मुंबईत हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत बुधवारी रात्रीसह गुरुवारीही वरुण राजाने जोरदार बरसात केली.  या मुसळधार पावसाने अंधेरी सब- वे, हिंदमाता, वडाळा, किंग्ज सर्कल आणि शीव आदी काही सखल भागात काही प्रमाणात पाणी साचून रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे या भागासह अनेक ठिकाणी रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती.
मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थानपन नियंत्रणाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्रीपासून शहर व उपनगरात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. गुरुवारी रात्री ८ वाजेपर्यंत तरी  १२ तासांच्या कालावधीत शहर भागात सर्वात जास्त म्हणजे ११९.०९ मिमी, पूर्व उपनगर भागात – ५८.४० मिमी आणि पश्चिम उपनगर भागात ७८.६९ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

शहर भागात ४ ठिकाणी इमारती, घरे कोसळण्याच्या दुर्घटना

मुंबईत रात्रीपासून पावसाची बरसात सुरू असताना काळबादेवी, बदामवाडी या ठिकाणी म्हाडाच्या तळमजला अधिक चार मजली इमारतीचा भाग कोसळण्याची दुर्घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत ७०- ८० नागरिक बचावले. तर सायन, हरी मस्जिद, गुरुनानक शाळेजवळ, तळमजला अधिक ५ मजली रिकाम्या इमारतीचा ( क्रमांक १५) काही भाग गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कोसळण्याची घटना घडली. तसेच, शहर भागात आणखीन दोन ठिकाणी घराचा भाग कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. मात्र सुदैवाने या घटनांत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

शॉर्टसर्किटच्या ८ घटना -: 

मुंबईत मुसळधार पावसात शहर भागात ४ ठिकाणी , पूर्व उपनगरात – ३ ठिकाणी व पश्चिम उपनगरात  -१ अशा ८ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या असून त्यात कोणीही जखमी झाले नाही.

झाडांच्या फांद्या पडण्याच्या १० घटना 

बुधवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसात उपनगरे भागात १० ठिकाणी झाडे व फांद्या पडण्याच्या घटना घडल्या. यामध्ये, उपनगरे भागातील पूर्व उपनगरात ३ ठिकाणी तर पश्चिम उपनगरे भागात ७ ठिकाणी झाडे व फांद्या पडल्याच्या घटना घडल्या. मात्र या घटनांत कोणीही जखमी झाले नाही.
शहर भागात -: 
मलबार हिल परिसर १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच, ग्रँट रोड – ८७ मिमी, भायखळा, मुंबई सेंट्रल  – ८२ मिमी, दादर -९५ मिमी, चंदनवाडी – ९८ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
पूर्व उपनगर -: 
मुलुंड परिसरात ५८ मि.मी, कुर्ला – ५२ मिमी, घाटकोपर – ४६ मि.मी, चेंबूर – ४३मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
पश्चिम उपनगर -: 
वांद्रे परिसरात – ८२ मि.मी, वर्सोवा – ६४ मि.मी, अंधेरी ( पूर्व) – ६० मि.मी, सांताक्रूझ – ५८ मि.मी आणि विलेपार्ले – ५७ मि.मी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.