जूनच्या अखेरिस जोरदार पावसाला सुरूवात

मुसळधार पावसाची आतुरतेने वाट पाहणा-या मुंबईकरांवर अखेरिस जूनच्या शेवटच्या दिवशी वरुणराजा प्रसन्न झाला. सकाळी संततधार बरसल्यानंतर बहुतांश ठिकाणी पावसाने दुपारनंतर धम्माल उडवून दिली. मुंबईत चार ठिकाणी शंभर मिमीहून जास्त पाऊस नोंदवला गेला. पावसाच्या कामगिरीमुळे कमाल तापमानही खाली उतरले. मुंबईत सांताक्रूझ येथे २७.२ तर कुलाब्यात ३६.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पावसाचा जोर मध्यरात्रीपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला.

पावसाचा जोर मध्यरात्रीपर्यंत कायम राहणार

सकाळी बारापर्यंतच कुलाब्यात १०० मिमी पावसाची नोंद झाली. सायंकाळी सातपर्यंत कुलाब्यात १५१ मिमी पाऊस झाला. त्याचवेळी भायखळ्यात १२६.५ तर महालक्ष्मीत ११६ मिमी पाऊस झाला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ७० मिमी तर मध्य मुंबईत विद्याविहार येथे ५८, चेंबूरमधील टाटा पॉवरमध्ये ७२ मिमी, पश्चिम उपनगरात सांताक्रूझमध्ये ५५, राममंदिर परिसरात ७९ मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या सहा तासांत बोरिवलीत ५० तर वरळीत १०५ मिमी पाऊस झाला. पावसाचा दिवसभर जोर दिसून आल्याने सकाळी कार्यालयीन वेळ गाठताना आणि सायंकाळी घरी परतताना दोन्ही वेळी छत्री असूनही मुंबईकरांना पावसात भिजावे लागले. मात्र संपूर्ण महिनाभर पावसाची गैरहजेरी दिसून येत असताना शेवटच्या दिवशी पावसाच्या कामगिरीमुळे मुंबईकराच्या चेह-यावर समाधानही दिसून येत होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here