पर्यटकांची लोणावळा-खंडाळामध्ये गर्दी : कोरोना निर्बंधांचे उल्लंघन

लोणावळ्यात पर्यटकांची काही हजार वाहने दाखल झाल्याने मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर जवळपास चार ते पाच किमी अंतरापर्यंत वाहनांचा रांगा लागल्या होत्या.

गेल्या काही दिवसांपासून लोणावळा-खंडाळा परिसरात पाऊसाचे जोरदार आगमन झाले. त्यामुळे निसर्गरम्य वातावरण बघणाऱ्या हौशी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. कोरोना महामारीमुळे शासकीय निर्बंध असताना देखील पर्यटक गर्दी करताना दिसून येत आहेत. शासकीय नियमांचे व पर्यटनबंदी आदेशाचे उल्लंघन करत लोणावळ्यात आलेल्या पर्यटकांना आज पोलिस प्रशासनाकडून माघारी पाठविण्यात आले. पावसाळा सुरु होताच शनिवार व रविवारी हजारोंच्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले आहेत. शनिवारी आणि रविवारी लोणावळा-खंडाळा परिसरातील सर्व पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल झाली होती. मात्र पोलिसांना लक्षात आल्यानंतर लोणावळा शहर पोलिसांनी भुशी धरणाकडे जाणार्‍या मार्गावरील नौसेना बाग याठिकाणी चेकपोस्ट नाका लावत विनाकारण नियमांचे उल्लंघन करत आलेल्या पर्यटकांना माघारी पाठवले.

हजारो पर्यटक लोणावळा-खंडाळात दाखल

लोणावळ्यात पर्यटकांची काही हजार वाहने दाखल झाल्याने मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर जवळपास चार ते पाच किमी अंतरापर्यंत वाहनांचा रांगा लागल्या होत्या. कोरोनाचे रुग्ण राज्यात कमी होऊ लागले असले, तरी अद्याप शासनाचे निर्बंध कायम आहेत. असे असताना लाॅकडाऊन उठण्याची वाट न पाहता दोन दिवसांपासून हजारो पर्यटक वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी लोणावळा व खंडाळा परिसरात दाखल झाल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. कोरोनामुक्त लोणावळा करण्यासाठी स्थानिक आजही नियमांचे पालन करत असताना पर्यटकांनी मात्र शहरात हौदोस घातला आहे.

(हेही वाचा : दहावीच्या मूल्यांकनासाठी शिक्षकांना भरावा लागतोय दंड!)

अतिरिक्त बंदोबस्त देण्याची मागणी

लोणावळा शहर पोलिस ठाण्यात कर्मचारी कमी असल्याने हजारो पर्यटकांच्या संख्येपुढे ही संख्या तोकडी पडत असल्याने बंदोबस्त नियोजन करण्यात अडचणी येतात. मागील काही वर्षांपासून लोणावळा शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यात कर्मचारी वाढविण्याची मागणी होत असताना त्याकडे वरिष्ठ लक्ष देत नाहीत. पावसाळ्यात लोणावळ्यात येणारे पर्यटक व त्यामुळे निर्माण होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षकांनी लोणावळ्याला अतिरिक्त बंदोबस्त द्यावा, अशी मागणी लोणावळा नगरपरिषदेने व शहरातील सामाजिक संस्थांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here