मशिदींवरील भोंगे उतरवणे हा धार्मिक नाही, तर सामाजिक मुद्दा असल्याचे राज ठाकरे यांनी वारंवार सांगितले आहे. या भोंग्यांचा हिंदूंनाच नाही तर मुस्लिमांनाही त्रास होत असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले होते. आता याचबाबत हिंदुस्थान मस्जिदचे विश्वस्त मुस्ताक मोमीन यांनी माहिती दिली आहे. मशिदींमधील आवाजाबाबत हिंदूंपेक्षा मुस्लिम समुदायाकडून तक्रारी जास्त येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
हिंदूंपेक्षा जास्त मुस्लिमांच्या तक्रारी
सर्वोच्च न्यायालयाचा भोंग्यांच्या बाबतीत दिलेला निर्णय सांगताना राज ठाकरे यांनी या भोंग्यांचा केवळ हिंदूंनाच नाही तर मुस्लिमांनाही त्रास होत असल्याचा दावा केला होता. आता याचबाबत हिंदुस्थान मस्जिदचे विश्वस्त मुस्ताक मोमीन यांनी मोठे विधान केले आहे. आम्ही स्वतः हा आवाज कमी करण्यासाठी आग्रही आहोत. या आवाजाचा लोकांना त्रास होतो याची आम्हाला कल्पना आहे. ब-याच वेळा मशिदींमधील भोंग्यांच्या आवाजाबाबत हिंदूंपेक्षा जास्त मुस्लिमांच्या तक्रारी आमच्याकडे येत असल्याचे हिंदुस्थान मस्जिदचे विश्वस्त मुस्ताक मोमीन यांनी सांगितले आहे.
(हेही वाचाः भाजप खासदार रोखणार राज ठाकरेंची अयोध्या वारी?)
मुंबई पोलिसांचा इशारा
मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी शहरातील मशिदी, हिंदू मंदिरे, जैन मंदिरे, चर्च आणि गुरूद्वारा अशा स्थळांच्या साधारण १०० प्रतिनिधी, सर्व धर्मांच्या धर्मगुरूंची बैठक घेतली. या बैठकीत तक्रार आल्यास कारवाई करू, असा इशाराही आयुक्तांनी यावेळी दिला. भोंगा/लाऊडस्पीकर लावण्यासाठी परवानगी घेणं आवश्यक असेल. एका वेळी तीन महिन्यांसाठीच परवानगी मिळणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. तर मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत एकूण २,४०० मंदिरं आहेत. यापैकी २४ मंदिरांनी भोंगे लावण्याची परवानगी घेतलेली आहे. त्यांना ५५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज ठेवू नका, असेही आयुक्तांकडून सांगण्यात आले आहे.
(हेही वाचाः अजित पवार म्हणतात, तर तृतीयपंथीही मुख्यमंत्री होईल)
Join Our WhatsApp Community