गेल्या अडीच वर्षांपासून जगातील इतर देशांप्रमाणे भारतातही कोरोनाने थैमान घातले. या महामारीमुळे करोडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. राज्यातही कोरोनामुळे आजवर(12 जून 2022 पर्यंत) तब्बल 1 लाख 47 हजार 868 लोकांचा कोरोनामुळे बळी गेला. यामध्ये सर्वाधिक पुरुषांना आपले प्राण गमवावे लागले असल्याची माहिती राज्य कोविड मृत्यू विश्लेषण समितीने दिली आहे. यामागची कारणे देखील समितीकडून देण्यात आली आहेत.
96 हजार पुरुषांनी गमावले प्राण
राज्यातील एकूण कोविड मृत्यूंपैकी 1 लाख 45 हजार 999 कोविड मृत्यूंमागील कारणांचे परीक्षण या समितीकडून करण्यात आले आहे. या समितीच्या अहवालानुसार, राज्यात एकूण 96 हजार 759 पुरुषांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर महिलांचा मृत्यूचा आकडा 49 हजार 240 आहे. पुरुषांच्या सर्वाधिक मृत्यूमागची कारणे देखील कोविड मृत्यू विश्लेषण समितीने आपल्या अहवालात दिली आहेत.
काय आहेत कारणे?
- पुरुषांमध्ये महिलांपेक्षा सहव्याधी(co-morbidities) चे प्रमाण अधिक आढळून आले
- व्यसनाधीनतेचे प्रमाण महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त
- महिलांचे आयुर्मान पुरुषांपेक्षा जास्त
- कोरोना काळात महिलांच्या तुलनेत पुरुष सर्वाधिक काळ घराच्या बाहेर असल्याचे मुख्य कारण आढळून आल्याचे कोविड मृत्यू विश्लेषण समितीमधील तज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
राज्य सरकारकडून कोविड मृतांची नोंद करण्यात येते. या नोंदीनुसार कोविड मृतांचा अभ्यास करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने आपला अहवाल सादर केला आहे.
Join Our WhatsApp Community