राजापूर तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील वेत्ये-तिवरे येथे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची नव्या वर्षामध्ये दोनवेळा अंडी सापडलेली असताना आता आज सकाळी पुन्हा एकदा तेथेच पुन्हा अंडी सापडली आहेत. कासवमित्र गोकुळ जाधव यांना ९४ अंडी सापडली असून त्यांचे सुरक्षितपणे संवर्धन करून ठेवण्यात आले आहे.
९४ अंड्यांचा समावेश
नव्या वर्षाच्या सुरुवातीला वेत्ये-तिवरे समुद्र किनारी गेल्या वीस दिवसांमध्ये कासवमित्र जाधव यांना दोनवेळा अंडी सापडली आहेत. त्यांनी वन खात्याच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे योग्य पद्धतीने संरक्षण केले आहे. किनारपट्टीवर आज नेहमीप्रमाणे फेरफटका मारत असताना जाधव यांनी पुन्हा एकदा अंडी आढळून आली. त्यामध्ये ९४ अंड्यांचा समावेश आहे.
(हेही वाचा –सामूहिक बलात्काराने हादरली गोवंडी, दोघांना अटक)
अंड्यांचे सुरक्षित ठिकाणी संवर्धन
जाधव यांनी तत्काळ राजापूर वन विभागाचे वनपाल सदानंद घाटगे, सागर गोसावी आदींशी संपर्क साधून त्याबाबतची माहिती दिली. त्यानंतर किना-यावरील वन्य प्राणी वा जंगली श्वापदांपासून त्या अंड्याचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली अंड्यांचे सुरक्षित ठिकाणी संवर्धन करून ठेवण्यात आले आहे.