मागील वर्षापासून आलेल्या कोरोना संकटामुळे सर्वात जास्त फटका हा शहरी भागाला बसल्याचे आपण पाहिले आहे. सर्वात जास्त कोरोना रुग्ण हे शहरी भागातच आढळून आले आहेत. यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर या शहरांचा समावेश असून, आता याच शहरी भागांमध्ये कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची देखील संख्या सर्वाधिक आहे.
पुण्यात सर्वाधिक बालके अनाथ
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात सापडले. या कोरोना विषाणूने अनेकांना आपले जीव गमवावे लागले. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक पालक गमावलेली मुलं असून, 1 हजार 380 बालके अनाथ झाली आहेत. पुण्यानंतर नागपूर 1 हजार 206, ठाणे 1 हजार 103, मुंबई 762 आणि नाशिक 508 बालकांनी आपले पालक गमावले आहेत. तर अनाथालयात दाखल करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये ठाणे 53, नागपूर 36 आणि पुणे 34 या जिल्ह्यांचा समावेश आहे. अनाथालयात दाखल करण्यात आलेल्यांमध्ये 221 मुलं आणि 180 मुलींचा समावेश आहे.
(हेही वाचाः भारतापुढे युरोपीयन युनियन नरमले… या देशांनी दिले कोविशिल्डला ग्रीन पासमध्ये स्थान)
राज्यात इतकी बालकं अनाथ
संपूर्ण महाराष्ट्राचा आकडा पाहिला तर राज्यात १३ हजार १९७ मुले अनाथ झाली असून, यापैकी 11 हजार 659 मुलांनी आपले वडील तर 1 हजार 538 मुलांनी आपल्या आईला गमावले आहे. 409 मुलं अशी आहेत ज्यांनी कोरोना महामारीत आपले दोन्ही पालक गमावले आहेत. अशा मुलांना अनाथालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती राज्य महिला व बाल कल्याण विभागाने नमूद केली आहे. सध्या या मुलांचे पुनर्वसन तसेच काळजी घेण्यासाठी जिल्हा स्तरावर टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही समिती काम करणार असून, मुलांचे समुपदेशन तसेच कायदेशीर व आर्थिक मदत करण्यावर भर देणार आहे. तसेच मुलांना विकणे किंवा चुकीच्या पद्धतीने दत्तक घेण्याच्या प्रकारावर देखील ही समिती लक्ष ठेवणार आहे.
काय म्हणाल्या महिला आणि बालकल्याण मंत्री
या मुलांचे पालकत्व सरकारने स्विकारले असून, त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेतली आहे. मुलांना लॅपटॉप, अँड्रॉइड मोबाईल तसेच इतर आधुनिक साधनांचा पुरवठा करत आहोत, असे महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले. जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हे कामकाज सुरू असून, सामाजिक संघटना व इंडियन सायकॅट्रिक सोसायटी मुंबईची मदत घेत असल्याचेही त्या म्हणाल्या.
(हेही वाचाः मुंबईत पुन्हा मृत्यूचा आकडा वाढतोय)
5 लाख रुपये जमा करणार
मुलांच्या भविष्यातील तरतूद म्हणून त्यांचा विमा काढण्यात येणार असून, त्यांच्या बँक खात्यात 5 लाख रुपये जमा केले जातील. या पैशांचा वापर मुलांना वयाच्या 18 वर्षानंतर करता येणार आहे. ज्या मुलांना बाळगण्यासाठी त्यांचे इतर नातेवाईक पुढे येतील त्यांच्याकडे मुलांना सोपवले जाणार आहे. बाल संगोपन योजनेअंतर्गत प्रत्येक मुलाला 1 हजार 125 रुपये दिले जाणार आहेत. अनाथालयात राहण्यापेक्षा लहान मूल आपल्या नातेवाईकांकडे सोपावण्याचा प्रयत्न अधिक करण्यात येत आहे, असेही त्या म्हणाल्या.
Join Our WhatsApp Community