पुणे रेल्वे पोलिसांनी आंतरराष्ट्रीय प्राण्यांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. रेल्वे प्रवास करून आंतरराष्ट्रीय प्राण्यांची तस्करी करणाऱ्या दोघांना लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अटक केली. त्यांच्याकडून विदेशी 279 कासवे, 1 हजार 207 इग्वाना सरडे, 230 बेटा फिश जप्त करण्यात आली आहेत. तरुणकुमार मोहन (वय २६ ) आणि श्रीनिवासन कमल (वय 20 ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ते चेन्नईहून मुंबईला हे प्राणी घेऊन जात होते. त्यानंतर ते परदेशात पाठवणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. आरोपी प्राण्याची वाहतूक कशासाठी करत होतो. यामध्ये इतर कोण सहभागी आहे याचा तपास पोलिस करत आहेत.
चेन्नई मार्गे मुंबईतून विदेशात पाठवले जाणार होते!
लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे गाड्यांतून विनापरवाना मालाची व प्राण्यांची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती लोहमार्ग पोलिस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक माैला सय्यद यांना सुचना देऊन रेल्वेगाड्यांवर पेट्रोलिंग करण्यास सांगितले होते. त्यानुसार मागील आठ ते दहा दिवसांपासून पथके गस्तीवर होती. दरम्यान पुणे ते लोणावळा प्रवासात चेन्नई एल टी टी एक्सप्रेसमधील ए/1 बोगीमधून प्रवास करणारे दोघे संशयास्पदरित्या आढळून आले. त्यांच्याकडे चाैकशी करून 4 ट्रॅव्हल बॅगा व दोन सॅगबॅगची तपासणी केली असता, त्यामध्ये कासव, इग्वाना जातीचे प्राणी व फायटर फिश आढळून आल्या. त्यांना प्राण्याची वाहतूक करत असल्याबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा वाहतुकीचा परवाना व कागदपत्रे नसल्याने दोघांना त्यांच्या बँगांसह ताब्यात घेण्यात आले. अफ्रिकन स्पुरेंड टॉर्टोइस जातीची कासवे आहेत. इग्नावा हा सरड्यासारखा प्राणी आहे. या तस्कारांकडे 279 कासवे, 1207 इग्वाना, 230 बेटा फिश आढळून आले आहे. यातील काही प्राणी विदेशी असल्याने ते सीमाशुल्क विभागाच्या ताब्यात सोपवण्यात आले आहेत. ताब्यात घेतलेल्या दोघांनाही सीमाशुल्क विभागाच्या ताब्यात सोपवण्यात आले आहे.
(हेही वाचा : मुंबईतील एका उड्डाणपुलाने चढली कोट्यावधींची ‘शिडी’)
Join Our WhatsApp Community