ऋजुता लुकतुके
देशात अन्नपदार्थांच्या घरपोच डिलिव्हरीचं काम करणारे किमान ३० टक्के तरुण हे पदवीधारक आहेत. आणि कामासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यापेक्षा त्यांनी मिळवलेलं शिक्षण काही पट मोठं आहे, असा निष्कर्ष नॅशनल काऊन्सिल ऑफ अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्च या संस्थेनं काढला आहे.
या अहवालासाठी संस्थेनं देशातील महानगरांमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या ९२४ लोकांचं सर्वेक्षण केलं. यातले १/३ लोक किमान पदवीधर आहेत. तसंच छोट्या शहरांमध्ये ही तफावत वाढत जाते, असं सर्वेक्षण सांगतं. छोट्या शहरांमध्ये पदवीधर डिलिव्हरी बॉयचं प्रमाण ३९.७ टक्के आहे. आणि यातील १२.५ टक्के लोक हे तंत्र शिक्षण घेतलेले किंवा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेले आहेत.
डिलिव्हरी बॉय हे गिग इकॉनॉमीतील घटक समजले जातात. गिग इकॉनॉमी किंवा अर्थव्यवस्था म्हणजे जी कायमस्वरुपी नोकरी नाही, जिथे नियमित पगार नाही, सामाजिक सुरक्षा नाही. पण, कामाचा मोबदला तेव्हाच्या तेव्हा दिला जातो, अशा स्वरुपाचे काम. फ्रीलान्स कामही याच अर्थव्यवस्थेचा भाग आहे. आताचं सर्वेक्षण महत्त्वाचं मानलं जातंय. कारण, देशात झोमॅटो तसंच स्विगीचे डिलिव्हरी बॉय म्हणून ७,००,००० ते १०,००,००० लोकांची नोंदणी झाली आहे. आणि सणासुदीच्या हंगामात अशा लोकांची गरज आणखी लागते. अशावेळी ७ लाखांपैकी अडीच लाख लोक हे किमान पदवीधर असल्याचं या सर्वेक्षणाचं म्हणणं आहे. आणि हा आकडा नक्कीच खूप मोठा आहे. ही छुपी बेरोजगारीच समजली जाईल.
‘काही डिलिव्हरी बॉय उच्चशिक्षित आहेत. आम्ही एका अशा मध्यमवयीन माणसाला भेटलो जो, एका पॉलिटेक्निक विद्यापीठाचा प्रमुख होता. इतरही अनेक लोक डिलिव्हरी उद्योगात येण्यापूर्वी लेखा परीक्षण, खानसामा, छोटे उद्योजक अशी कितीतरी जास्त प्रतिष्ठेची कामं करत होते,’ असं बोर्नाली भंडारी यांनी सांगितलं. त्यांनीच पुढाकार घेऊन नॅशनल काऊन्सिलचा हा अहवाल तयार केला आहे.
(हेही वाचा –Samruddhi Express Highway : ‘समृद्धी’वर सर्वाधिक अपघात ‘सकाळी’ आणि ‘रात्री’ मृत्यूच्या घडतायेत घटना)
मग डिलिव्हरी बॉय म्हणून त्यांना मिळणारा पगार किती आहे?
अशा लोकांना महिन्याला सरासरी २०,७४४ रुपये मिळतात. त्यांच्या वयाच्या देशातील इतर तरुणांना त्यांनी केलेल्या कामासाठी सरासरी मासिक २२,४९४ रुपये मिळतात. देशाच्या श्रम मंत्रालयाने ही आकडेवारी दिली आहे. पण, त्यांच्या वयाचे (१८ ते ३५ वयोगट) इतर लोक हे माध्यमिक शालेय अभ्यासक्रम म्हणजेच आठवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेले लोक आहेत. डिलिव्हरी उद्योगात कामाचे तासही जास्त आहेत. पण, तुलनेनं पगार ८ टक्के कमी आहे.
डिलिव्हरी बॉयना मिळणारा मोबदला २०१९ नंतर ११ टक्क्यांनी वाढला आहे. कोव्हिड पूर्वी त्यांना सरासरी ११,९६३ रुपये महिना मिळत होते. पण, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या. शिवाय इतर खर्चही वाढल्यामुळे त्यांचा मोबदला वाढवण्यात आला. निव्वळ मोबदल्याचा निकष लावला तर अशा डिलिव्हरी बॉयचा मोबदला फक्त ४ टक्क्यांनी वाढला आहे. निव्वळ मोबदला म्हणजे डिलिव्हरीसाठी मिळणारी एकूण रक्कम. यात महागाई दर गृहित धरलेला नसतो.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community