नवरात्रोत्सवापूर्वीच कोविडबाधित रुग्णांचा आकडा सहाशेपार

बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९७ टक्के आहे.

मुंबईत कोविड बाधित रुग्णांची संख्या कमी होत असतानाच पुन्हा एकदा या संख्येने उसळी घेतली आहे. बुधवारी दिवसभरात ६२९ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात केलेल्या एकूण ३९ हजार ५६९ कोविड चाचण्यांमधून सहाशे पार रुग्णसंख्या आढळून आली आहे. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून सरासरी दोन एवढा असलेला मृत्यूचा आकडाही दिवसभरात वाढून सातवर पोहोचला आहे. घटस्थापनेपूर्वीच रुग्ण वाढीची संख्या वाढल्याने मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

५४० बाधित रुग्ण बरे होवून घरी परतले!

मुंबईत बुधवारी दिवसभरात ५४० बाधित रुग्ण बरे होवून घरी परतले. तर ६२९ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात ३९ हजार ५६९ चाचण्या केल्यानंतर ६२९ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर मंगळवारी ३१ हजार ९६९ चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ४३३ नवीन रुग्ण आढळून आले. मंगळवारी दिवसभरात जिथे २ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तिथे बुधवारी ७ रुग्णांचा मृत्यू झाला होता.

(हेही वाचा : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आक्रमक! ‘या’ दिवशी पुकारला ‘महाराष्ट्र बंद’)

बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के

या सातही मृत्यू पावलेल्या रुग्णांपैकी ६ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. यामधील पाच रुग्ण पुरुष आणि २ महिलांचा समावेश होता. ५ रुग्णांचे वय हे साठीपार होते, तर उर्वरीत दोन रुग्णांचे वय हे ४० ते ६० वर्षे या वयोगटातील मधील आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९७ टक्के असून मागील आठवड्यात मुंबइतील एकूण कोविड वाढीचा दर हा ०.०६ टक्के एवढा आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर हा ११३१ दिवस एवढा आहे. मुंबईतील झोपडपट्टया व चाळी या सक्रिय कंटेन्मेंटची संख्या शुन्य असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ४८ एवढी आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here