सांभाळा… मुंबईत म्युकरमायकोसीसचे १११ रुग्ण!

पोस्ट कोविड किंवा कोविडचे उपचार सुरू असताना “म्युकरमायकोसीस” आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या आजारामध्ये कान, नाक, घसा आणि डोळ्यावर गंभीर परिणाम होत आहेत.

मुंबई शहरात १११ म्युकरमायकोसीस रुग्ण आढळून आले असून, यापैकी बहुतांशी रुग्ण हे मुंबईबाहेरील असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हे रुग्ण शीव रुग्णालय ३२, केईएम रुग्णालय ३४, नायर रुग्णालय ३८ आणि कूपर रुग्णालयात ०७ रुग्ण दाखल करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्थायी समितीत दिली. म्युकरमायकोसीस हा आजार बुरशीजन्य आहे. परंतु संसर्गजन्य असल्याचे आढळून आलेले नाही. याबाबत कोविड रुग्णालयातील डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच या आजारावर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा गट तयार केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

काकाणी यांची माहिती

पोस्ट कोविड किंवा कोविडचे उपचार सुरू असताना “म्युकरमायकोसीस” आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या आजारामध्ये कान, नाक, घसा आणि डोळ्यावर गंभीर परिणाम होत आहेत. म्युकरमायकोसीस इंजेक्शनचे दर आणि उपचार पद्धतीचे दर महागडे आहेत, असे कळते. या पार्श्वभूमीवर आपण मुंबई शहरामध्ये आपली आरोग्य यंत्रणा सज्ज केली आहे का, अशी विचारणा करत भाजपचे महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी याची सविस्तर माहिती आरोग्य यंत्रणेस, जन प्रतिनिधीस आणि मुंबईकरांस मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आयुक्तांनी याबाबत सविस्तर लेखी निवेदन करावे, अशी आग्रहाची मागणी केली होती. यावर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी निवेदन करताना ही माहिती दिली.

(हेही वाचाः म्युकरमायकोसीस म्हणजे काय? काय आहेत लक्षणे? कसे दूर ठेवाल? वाचा उत्तरे…)

प्रशासन सज्ज

हा आजार होऊ नये आणि झाल्यास उपचार पद्धती उपकरणे तसेच औषधे, याबाबत ट्रिटमेंट प्रोटोकॉल निश्चित केलेला असून त्याप्रमाणे कार्यवाही सुरू केली असल्याचेही काकाणी यांनी सांगितले. हा रोग टाळण्यासाठी उपाययोजनांची खबरदारी माहिती सर्व रुग्णालयात दिली आहे. तसेच कोविड उपचार पद्धती स्टेरॉईड तथा टोसीलीझुमॅब चा अती वापर टाळावा. विशेषतः डायबेटिक रुग्णांबाबत ही विशेष काळजी घ्यावी, अशीही सूचना त्यांनी केली आहे. म्युकरमायकोसीस या आजारावर वापरण्यात येणाऱ्या ‘एम्फो टेरेसीन बी’ इंजेक्शन व इतर औषधे खरेदी करण्यासाठी महापालिकेच्या मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणामार्फत प्रक्रिया सुरू केलेली आहे. तोपर्यंत रुग्णालयांना स्थानिक स्तरावर खरेदी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. म्युकरमायकोसीस आजाराच्या रुग्णांना ८ ते १२ आठवडे निरीक्षणाखाली ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

(हेही वाचाः म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर होणार आता मोफत उपचार! काय म्हणाले टोपे?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here