मशिदींवरील अनधिकृत भोंगे उतरवण्याच्या राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमनंतर राज्यातील अनेक ठिकाणच्या मशिदींमध्ये भोंग्यांविना पहाटेची अज़ान होत आहे. त्याचबरोबर शिर्डीचे साई बाबा मंदिर आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील काकड आरतीही आता लाऊडस्पीकरविना करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः साईभक्तांमध्ये नाराजी, शिर्डीत लाऊडस्पीकर विना होणार काकड आरतीसह शेजारती!)
काकड आरती लाऊडस्पीकरविना
3 मे पर्यंत राज्यातील मशिदींवरचे अनधिकृत भोंगे खाली उतरवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिले होते. त्यानंतर बुधवारपासून अनेक मशिदींमध्ये पहाटेच्या वेळची अज़ान ही लाऊडस्पीकरविना करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याची विनंती पोलिस प्रशासनाकडून सर्वच धार्मिक स्थळांना करण्यात आली आहे. त्यामुळेच शिर्डीचे साई बाबा मंदिर आणि पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात पहाटेची काकड आरती ही लाऊडस्पीकरविना करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांकडून आवाहन
रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्याने लाऊडस्पीकर लावण्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत आता धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर्सना परवानगी देण्यात आली आहे. राज्यातील शांतता बिघडू नये यासाठी सर्व धार्मिक स्थळांना पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.
(हेही वाचाः “सरकार अल्टिमेटमवर नाही तर कायद्यावर चालतं”; अजित पवारांनी दरडावलं)
Join Our WhatsApp Community