बेमुदत संपाची घोषणा करत राज्यातील सरकारी आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवासी डॉक्टरांनी बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. जेजे वसतीगृहात विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मच्छरांची अंडी सापडली आहेत. बीएमएस वसतीगृहात कूलर पाणी पिण्यास कोणतेही विद्यार्थी धजावत नाहीत. या पाण्याच्या टाकीबाबत तक्रार करुनही प्रशासनाने कोणतीच कारवाई केलेली नाही. वेगवेगळ्या वसतीगृहातील इमारतीत स्वच्छता राखली जात नसल्याने, निवासी डॉक्टरांना फंगल इन्फेक्शनसारखे त्वचेचे आजार झाले आहेत.
सायंकाळी रुममध्ये उंदीर शिरतात. या उंदरांना पळवण्याची ताकद २४ तास ड्युटी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कशी असेल, असा प्रश्नही डॉक्टर्स विचारतात. रुग्णसेवा बजावताना तासांचे भान नसते. शरीर थकल्यानंतर सुखाची झोपही नशीबी येत नाही. डॉक्टरांना लेप्टोस्पायरॉसिस, मलेरिया आणि डेंग्यूचीही बाधा वाढू लागल्या आहेत. जुन्या निवासी इमारतीत आठ माळ्यांवर केवळ १०० खाटा उपलब्ध आहेत. प्रत्यक्षात ३०० निवासी डॉक्टर्स या भागांत राहतात. बीएमएस इमारतीत अंदाजे ८० निवासी डॉक्टर्स तर आरएमओ वसाहत इमारतीत अंदाजे ९० महिला निवासी डॉक्टर्स राहतात. एका रुममध्ये केवळ तीन-पाच डॉक्टरांना राहण्याची जागा असताना प्रत्यक्षात सहा-आठ डॉक्टर्स चटई जमिनीवर टाकून झोपतात. जुन्या आरएमओ इमारतीचे बांधकाम सुरु असले तरीही प्रत्यक्षात काही भागांमध्ये पाण्याची गळती सुरु आहे.
( हेही वाचा: राज्यभरातील सात हजार निवासी डाॅक्टर संपावर; रुग्णांचे हाल )
वसतीगृहाबाबत आम्ही अनेकदा जेजे प्रशासनाकडे तक्रारी नोंदवल्या. मात्र अद्यापही त्यावर काहीच निर्णय झालेला नसल्याची खंत मार्डच्या डॉक्टरांनी व्यक्त केली. एका डॉक्टरावर नोव्हेंबर महिन्यात रुममधील पंखा पडला. दुर्घटनेत डॉक्टर थोडक्यात बचावला. इमारतीच्या आवाराबाहेर वीजेची सोय नसते. इमारतीतील सांडपाणी रस्त्यावर बाहेरच पडलेले असते. असा दुर्गंधीयुक्त जागेत कसे राहायचे, असा प्रश्नही निवासी डॉक्टरांनी विचारला. या बाबतीत जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.