मागील दिवाळीत फटाक्यांवर बंदी असल्याने फटक्यांची आतषबाजी करता न आलेल्या नागरिकांनी यंदा निर्बंध शिथिल करताच जोरदार फटाकेबाजी केली. यामध्ये मागील सहा दिवसांमध्ये फटाक्यांमुळे ६५ ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. यातील २५ आगीच्या घटना या केवळ अंधेरी ते दहिसर या भागातीलच आहेत. त्यामुळे अंधेरी ते दहिसर भागांमध्ये यंदा अधिक फटाके फोडण्यात आले. त्याच वेळी सावधानता न बाळगल्याने आगीच्याही घटना या भागात अधिक घडल्याचे दिसून येत आहे.
लक्ष्मी पुजनाच्या दिवशीच सर्वाधिक आगी
मुंबई अग्निशमन दलाला १ ते ६ नोव्हेंबर या कालावधीमध्ये आगी लागल्याचे एकूण १५९ दूरध्वनी संपर्क आले. त्यातील ६५ संपर्क हे फटाक्यांमुळे लागलेल्या आगींचे होते. यामध्ये लक्ष्मी पुजनाच्या दिवशीच ३३ आगी या फटाक्यांमुळे लागल्या होत्या, तर दुसऱ्या दिवशी १९ आगी या फटाक्यांमुळे लागल्या होत्या. दिवाळीचा शेवटचा दिवस मानल्या जाणाऱ्या भाऊबीजेच्या दिवशी ७ आगी या फटाक्यांमुळे लागल्या.
अंधेरी ते दहिसरमध्ये ४० ते ४२ टक्के आगी
यातील अग्निशमन दलाच्या ‘रिजन फोर’ अर्थात अंधेरी ते दहिसर या परिसरात पाच दिवसांमध्ये सर्व प्रकारच्या आगी लागण्याच्या एकूण ६४ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यातील फटाक्यांमुळे लागी लागण्याच्या घटनांची संख्या २५ एवढी होती. त्यामुळे सुमारे ४० ते ४२ टक्के घटना या फटाक्यांमुळे या केवळ एका रिजनमध्ये घडल्या आहेत. तसेच मुंबईत फटाक्यांमुळे लागलेल्या एकूण आगीच्या संख्येच्या तुलनेतही या एका रिजनमध्ये लागलेल्या आगींचे प्रमाणे सुमारे ४० टक्के एवढे असल्याचे पहायला मिळत आहे.
(हेही वाचा : आता संपूर्ण एसटी होणार ठप्प?)
योग्यप्रकारे काळजी घेतली नाही!
मागील दोन वर्षे फटाक्यांमुळे लागलेल्या आगींचे प्रमाण कमी होते, परंतु यावर्षी निर्बंध शिथील केल्यामुळे लोकांकडून आतषबाजी करताना योग्यप्रकारे काळजी घेण्यात आली नाही, त्यामुळे आगी लागण्याचे प्रकार घडले. दरवर्षीच असे प्रकार घडत असतात. मागील वर्षी कोविडमुळे लोकांना दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करता आला नव्हता, पण यंदा त्यांनी जास्त प्रमाणात फटाके फोडले. या फटाक्यांमुळे लागलेल्या आगींच्या संख्या अधिक असल्या तरी त्या एवढ्या मोठ्या स्वरुपाच्या नव्हत्या, असे अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी हेमंत परब यांनी स्पष्ट केले.
अंधेरी ते दहिसरमधील आगीच्या घटना/कंसात एकूण आगीच्या तक्रारी
- २ नोव्हेंबर : ०१ (०५)
- ३ नोव्हेंबर : ००(०४)
- ४ नोव्हेंबर : १३(२४)
- ५नोव्हेंबर : ०७( १२)
- ६ नोव्हेंबर : ०४ (०९)