बाप्पांचा मुक्काम वाढतोय : दीड दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनाकडे भक्तांची पाठ

116

कोविड निर्बंधानंतर प्रथमच निर्बंधमुक्त साजरा होत असलेल्या गणेशोत्सवामध्ये यंदा भक्तांनी बाप्पांचा सहवास अजून काही दिवस लांबवला आहे. एरव्ही गणेशोत्सवामध्ये बाप्पांचा पाहुणचार दीड दिवसांचा करणाऱ्या भक्तांनी यंदा दीड ऐवजी पाच दिवसांचा गणपती ठेवण्यावर भर दिल्याचे पहायला मिळत आहे. यंदा दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन कमी झालेले पहायला मिळाले असून त्यामुळे बाप्पांचा मुक्काम वाढलेला पहायला मिळत आहे. बाप्पांचा वाढलेल्या मुक्कामामुळे यंदा पाच आणि गौरीगणपतीच्या दिवशी गणेश मूर्तींचे विसर्जन अधिक प्रमाणात होईल,असे बोलले जात आहे.

2

विसर्जन स्थळी गर्दी दिसलीच नाही

श्री गणरायांचे आगमन ३१ सप्टेंबरला झाल्यानंतर लाडू,मोदकांसह पंच पक्वानांचा आस्वाद घेत दीड दिवसांच्या गणपती बाप्पांनी निरोप घेतला. गुलाल उधळत आणि ढोलताशांच्या गजरात भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पांला निरोप दिला. मात्र, मागील दोन वर्षे कोविडमुळे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला नव्हता. त्यामुळे कोविडनंतर निर्बंधमुक्त होत असलेल्या या सणामध्ये भाविकांनी गणरायांचा पाहुणचार आपल्या घरी अधिक काही दिवस वाढवण्यावर भर दिल्याचे दीड दिवसांच्या विसर्जनावरून स्पष्ट होत आहे. एरव्ही दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी नैसर्गिक विसर्जन स्थळांसह कृत्रिम तलावांच्याठिकाणी दिसून आली नाही.

3

(हेही वाचा ‘ट्विटर’कडून डिलीट बटण उपलब्ध, पण कुणासाठी… )

३४,९६२ गणेशमूर्तींचे विसर्जन हे कृत्रिम तलावांमध्ये पार पडले

मंगळवारी रात्रीपर्यंत दीड दिवसाच्या एकूण ३४,०७२ गणेश मूर्तींचे विसर्जन विविध ठिकाणच्या विसर्जन स्थळांवर पार पडले. यामध्ये १०८ सार्वजनिक आणि ३३,९६२ घरगुती आणि ५२ हरतालिका आदींचा समावेश आहे. यापैकी १३,३६२ गणेश मूर्तींचे विसर्जन हे कृत्रिम तलावांमध्ये पार पडले. यामध्ये १३,२९४ गणेश मूर्तींचा समावेश होता.

कल्याण-डोंबिवलीत साडेबारा हजार बाप्पांना भावपूर्ण निरोप

आगमनाने वातावरणात आनंद पसरविणाऱ्या गणपती बाप्पांनी भक्ताच्या घरचा पाहुणचार घेत निरोप घेतला. दीड दिवसाच्या बाप्पांना निरोप देण्यासाठी पालिका प्रशासनासह पोलीस यंत्रणेकडून कल्याणच्या दुर्गाडी गणेश घाटावर आणि डोंबिवलीतील मोठागाव गणेश घाटावर सज्जता ठेवण्यात आली होती. १२ हजार ५०० बाप्पांना वाजत गाजत टाळ मृदुंगाच्या गजरात निरोप देण्यात आला. दीड दिवस गणेश मूर्तीचे पूजन करणाऱ्या काही भक्तांच्या म्हणण्यानुसार, मागील दोन वर्षे कोविडमुळे बाप्पांची मनोभावे अशी सेवा करता आली नाही. त्यामुळे बाप्पांची सेवा दीड दिवस केल्यानंतर त्यांना निरोप देण्यात आला होता. परंतु यंदा कोविड निर्बंधमुक्त सण साजरा करण्यात येत असल्याने बाप्पांची सेवा पाच दिवसांपर्यंत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे भक्तांचे म्हणणे आहे. प्रत्येक गणेश भक्तांनी, यंदा आपल्या लाडक्या बाप्पांना सेवा अधिक काही दिवस करण्याची संधी न दवडण्याचा निर्धार केला असून काही जणांची इच्छा असूनही कामांमुळे वेळ नसल्याने आपण दीड दिवसांमध्ये बाप्पांना निरोप दिल्याचे म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.