Shivaji Park : खासदार शेवाळे यांच्या सुचनेनंतरही शिवाजी पार्कमधील धुळीची समस्या ‘जैसे थे’च

शिवाजी पार्कमधील जनतेच्या सर्व समस्यांची दखल घेत त्यावर त्वरित उपाययोजना करण्याची ग्वाही यावेळी खासदार राहुल शेवाळे यांनी दिली होती.

196

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) येथील लाल मातीच्या धुळीमुळे गेल्या काही काळापासून आजूबाजूच्या परिसरात प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. यावर सकारात्मक चर्चा करून तोडगा काढण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांच्या वतीने शिवाजी पार्क जिमखाना येथे ‘थेट संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शिवाजी पार्कमधील धुळीच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश देताना मुंबई क्रिकेट असोसिएशनलाही सूचना केल्या होत्या. परंतु ४० दिवस उलटत आले तरीही या शिवाजी पार्कमधील धुळीची समस्या दूर झाली नसून त्यामुळे येत्या पावसाळ्यातील यावरील लाल माती वाहून जात शिवाजी पार्क परिसरातील रस्ते जलमय होण्याची भीती वर्तवली जात आहे.

शिवाजी पार्कमधील जनतेच्या समस्या जाणून घेतल्यानंतर खासदार राहुल शेवाळे यांनी या कार्यक्रमात बोलतांना, सुमारे तीन वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे अशास्त्रीय पद्धतीने टाकलेली अतिरिक्त माती काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने त्वरित कामाला सुरुवात करावी, अशी सूचना पालिका प्रशासनाला केली होती. तसेच सुमारे तीन वर्षांपूर्वी शिवाजी पार्कमध्ये कोणत्याही शास्त्रीय अभ्यासाशिवाय अतिरिक्त माती टाकणाऱ्या कत्रांटदारांविरोधात कारवाई करण्याचीही सूचना केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात (शिवाजी पार्क) मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) वतीनेही अनेक सामने खेळवले जातात, त्यांच्याकडूनही पार्काचा वापर केला जातो, त्यामुळे शिवाजी पार्कच्या देखभालीची जबाबदारी ‘एमसीए’ ने घ्यावी.

(हेही वाचा Trimbakeshwar Temple : औरंगजेबाने त्र्यंबकेश्वर मंदिर पाडून बांधलेली मशीद; मराठ्यांनी केला जीर्णोद्धार; नाशिकच्या ज्योतिर्लिंगाचा काय आहे इतिहास?)

वानखेडे मैदानाची जशी काळजी घेतली जाते तशी या शिवाजी पार्कची घेतली जावी. एमसीएकडे तज्ज्ञ मंडळी असून त्यांनी वानखेडेप्रमाणे शिवाजी पार्क मैदानाची देखभाल करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन खासदार राहुल शेवाळे यांनी केले होते. शिवाजी पार्कमधील जनतेच्या सर्व समस्यांची दखल घेत त्यावर त्वरित उपाययोजना करण्याची ग्वाही यावेळी खासदारांनी दिली होती.

शिवाजी पार्कमधील नागरिकांच्या समस्या जाणून घेताना शेवाळे यांनी महापालिका प्रशासनाला केलेल्या सुचनांनंतर आजतागायत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नसून उलट आजही धुळीमुळे येथील जनता त्रस्त आहे. हवेमुळे धुळीचे लोळ उडत असून यामध्ये शिवाजी पार्कमध्ये फिरणाऱ्या जनतेचे कपडेही मातीने माखून निघत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.