BMC : अधिकार शासनाचे, सूचना महापालिकेला: खासदार श्रीकांत शिंदे यांची महापालिका आयुक्तांसोबतच्या बैठकीत काय झाली चर्चा?

मुंबई महापालिका मुख्यालयात शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महापालिका आयुक्तांसोबत विविध समस्यांबाबत घेतलेल्या बैठकीत प्रामुख्याने रखडलेल्या इमारतींचा पुनर्विकासाला गती देण्याचा मुद्दा मांडला.

220

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुंबईतील विविध विकासाच्या प्रश्नांबाबत महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यासह अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या बैठकीमध्ये अनेक वर्षांपासून रखडलेला इमारतींचा पुनर्विकास, कोळीवाड्यातील घरांची दुरुस्ती तथा पुनर्बांधणी करण्यासाठी नवीन डिसीआर, मरिन ड्राईव्ह तसेच फोर्ट परिसराचे सुशोभिकरण आदी मुद्यावर चर्चा करण्यात आली आहे. यातील जुन्या इमारतींचा पुनर्विकास तसेच क्लस्टर डेव्हलपमेंट आणि कोळीवाड्यांमधील घरांची पुनर्बांधणीकरता बनवण्यात येणाऱ्या धोरणाबाबतचा अधिकार हा शासनाचा असून शासनाने याबाबतचे आदेश महापालिकेला दिले तरच याची पुढील कार्यवाही महापालिकेच्या माध्यमातून केली जावू शकते. परंतु शासनाच्या अधिकारामधील मुद्दयाबाबत महापालिकेला सूचना करत शिंदे यांनी नक्की काय साध्य केले असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मुंबई महापालिका मुख्यालयात शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महापालिका आयुक्तांसोबत विविध समस्यांबाबत घेतलेल्या बैठकीत प्रामुख्याने रखडलेल्या इमारतींचा पुनर्विकासाला गती देण्याचा मुद्दा मांडला. आज अनेक इमारतींचे पुनर्विकास प्रकल्पाचे काम रखडले असून त्यासाठी धोरण बनवण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. मागील १४ ते १५ वर्षे आपल्या मूळ घरापासून लांब राहणाऱ्या रहिवाशांच्या इमारतींचा पुनर्विकास जलदगतीने व्हावा यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक आहे. ठाण्यात क्लस्टर डेव्हलपमेंटद्वारे सिडकोच्या माध्यमातून बांधकाम करून लोकांना घरे देण्यात आली आहे. यासाठी सर्व प्राधिकरणे एकत्र येवून धोरण बनवल्यास सरकारच्या माध्यमातून लोकांना हक्काची घरे मिळू शकतील, असे शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले.

तसेच मुंबईचा मूळ रहिवाशी असलेल्या कोळी बांधवांचा परिवार वाढत जात आहे, परंतु कोळीवाड्यातील त्यांच्या घरांचा विकास केला जात नाही. घराची उंची वाढवणे गरजेचे असून अशी घरांची उंची वाढवल्यास महापालिकेच्या माध्यमातून कारवाई केली जाते. त्यामुळे कोळीवाड्यांमधील घरांचे बांधकाम कोळी बांधवांना करता यावे यासाठी स्वतंत्र नवीन डिसीआर बनवला जावा, आणि त्यामध्ये कोळी बांधवांना या समितीमध्ये घेतले जावे अशाप्रकारची सूचना केली आहे. जेणेकरून यासाठी किती एफएसआयची गरज आहे याची माहिती मिळेल, ज्यामुळे त्यांना हक्काचे मोठे घर मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले.

(हेही वाचा Islamic Encroachment : आता पुण्याची ऐतिहासिक ओळख असलेली पर्वती टेकडी इस्लामी अतिक्रमणाची शिकार )

मुंबईतील सौंदर्यीकरणाचे काम जोरात सुरु असून त्याअंतर्गत मरिन ड्राईव्ह येथील एक किलोमीटर परिसराचे सुशोभिकरण करण्याची सूचना केली आहे. प्रायोगिक तत्वावर एक किलोमीटर लांबीचा भाग सुशोभित करण्यासाठी संकल्पना मांडण्यात आली आहे. तसेच फोर्ट हा परिसर पुरातन वास्तू वारसा क्षेत्रात येत असल्याने एशियाटिक लायब्ररीपासून ते हुतात्मा चौक परिसराचे सुशोभिकरण करण्याची सूचना केली आहे. याठिकाणी ब्रिटीशकालिन जुन्या इमारती वास्तू असून हा वास्तू वारसा पाहण्यासाठी परदेशी पर्यटक येत असल्याने त्यांना भावेल अशाप्रकारे या परिसराचा भाग सुशोभित करण्यावर भर देण्यात यावे अशीही सूचना केल्याचे शिंदे यांनी यांनी सांगितले. याबरोबरच आपला दवाखाना, शौचालयांचे बांधकाम, रस्त्यांची कामे आदींबाबतही सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेच्या मुंबईतील शाखा संपर्क अभियानातून लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न होत आहे. शाखा फिरल्यानंतर ज्या समस्या दिसल्या,त्यांचे निराकरण करण्यासाठी ही बैठक होती आणि  ही बैठक म्हणजे त्याचा प्रत्यय असल्याचे डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले. काही लोक एसी कार्यालयात बसून तसेच हवेत उडून आदेश करायचे. परंतु हे सरकार सर्वसामान्य जनतेचे आहे. पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री यांनी तळागाळात जावून लोकांचे प्रश्न जाणून घेण्याच्या सूचना केल्या आहेत, त्यानुसारच जनतेच्या समस्या शाखा संपर्क अभियानातून जाणून घेतल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

आदित्यच्या पावलावर श्रीकांत शिंदे यांचे पाऊल

मुंबई महापालिकेत शिवसेनेचे सत्ता असताना तत्कालिन शिवसेना नेते व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे महापालिकेत येवून महापालिका आयुक्तांसोबत मुंबईतील विकासकामांबाबत आढावा बैठक घ्यायचे. त्यानंतर आदित्य ठाकरे हे मंत्री बनल्यानंतर महापालिकेत येवून बैठका घेऊ लागले आहे. परंतु त्याप्रमाणेच आता श्रीकांत शिंदे यांनी  मुंबईतील समस्यांना हात घालून महापालिका आयुक्तांसोबतच्या बैठकीत मांडून त्यांचे निराकारण करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे हे महापालिकेत आल्यानंतर चहल हे इमारतीच्या खाली उतरतून त्यांचे स्वागत करण्यासाठी आणि नंतर खालीपर्यंत सोडायला जायचे, तोच सन्मान चहल यांनी श्रीकांत शिंदे यांना दिला. श्रीकांत शिंदे यांना इमारतीच्या खाली उतरून त्यांचे स्वागत केले आणि नंतर त्यांना खाली उतरतून वाहनापर्यंत नेवूनही सोडले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या पावलावर पाऊल शिंदे यांचे पडताच चहल यांनीही आपली भूमिका तीच निभावली,असे पहायला मिळाले. विशेष म्हणजे श्रीकांत शिंदे हे प्रसारमाध्यमांशी बोलतांना चहल यांना हलकीशी धक्काबुक्की झाली तरीही त्यांनी त्यावर आपल्या सुरक्षा रक्षकांना सूचना करत कुणालाही काही बोलू नका, अशाच सूचना करत सर्व सहनही केल्याचे पहायला मिळाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.