एमपीएससी परीक्षांची नवी तारीख जाहीर… कधी होणार परीक्षा? वाचा…

तारीख जाहीर होऊन येत्या आठ दिवसांत ही परीक्षा होईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आज परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी विविध भरत्यांसाठीची राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलल्याने, काल मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा राग उफाळून आला. गेल्या वर्षीपासून या परीक्षा तब्बल चार वेळा पुढे ढकलल्या जात असल्याने विद्यार्थ्यांचा संताप होणे ही साहजिक बाब आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल विद्यार्थ्यांना वचन दिल्याप्रमाणे आज या परीक्षांची नवी तारीख जाहीर झाली आहे. ही परीक्षा आता २१ मार्च रोजी घेण्यात येणार आहे.

सत्ताधा-यांनीही व्यक्त केली होती नाराजी

काल आयोगाकडून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर, राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले. वारंवार परीक्षा पुढे ढकलल्या जात असल्याने वर्षानुवर्ष या परीक्षांसाठी तयारी करणा-या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे काल विरोधकांबरोबरच सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी सुद्धा परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली. एकूणच राजकीय वातावरण तापल्याने काल रात्री मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना, या परीक्षा महिन्यांसाठी नाही, तर काही दिवसांकरता पुढे ढकलण्यात येत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना होणारा त्रास मी समजू शकतो म्हणून, अधिक वेळ न घालवता उद्याच परीक्षांची नवी तारीख जाहीर करण्यात येईल, असे वचन त्यांनी काल विद्यार्थ्यांना दिले होते. तारीख जाहीर होऊन येत्या आठ दिवसांत ही परीक्षा होईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आज परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. येत्या २१ मार्चला ही परीक्षा होणार आहे.

विद्यार्थ्यांना आवाहन

परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाबाबत बोलताना राज्यात कोरोना पुन्हा डोके वर काढत असल्याने, खबरदारी घेण्याची गरज आहे. परीक्षांसाठी मोठ्या प्रमाणात शासकीय यंत्रणा कामाला लागलेली असते. त्यामुळे त्यासाठी कार्यरत असणा-या कर्मचा-यांची कोविड टेस्ट करणं महत्त्वाचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विद्यार्थी परीक्षेला आल्यानंतर कोणत्याही दडपणात राहू नयेत, अशी सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे दिलगिरी व्यक्त करत विद्यार्थ्यांना निराश होऊ नका, अभ्यास चालू ठेवा. सरकार तुमच्या पाठीशी आहे, अशा शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांना दिलासा दिला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here