उच्च शैक्षणिक अर्हता असूनही अपात्र! अर्जासाठी मुदतवाढ देण्याची MPSC च्या उमेदवारांची मागणी

102

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी व माहिती अधिकारी या पदांसाठी जम्बो भरतीची जाहिरात प्रसिध्द केली आहे. या जाहिरातीसाठी पत्रकारिता व जनसंपर्क क्षेत्रातील उच्च शैक्षणिक अर्हता असतांनाही उमेदवारांचे ऑनलाईन अर्जासाठी अपात्र असल्याचे संदेश येत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या हेल्पलाईनच्या माध्यमातून उमेदवारांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे राज्यातील लाखो पत्रकारिता पदव्युत्तर पदवीधारकांचा जीव टांगणीला लागला आहे. कधी नव्हे अनेक वर्षापासून उपलब्ध झालेली संधी एमपीएससीच्या चुकीच्या ऑनलाईन प्रक्रीयेमुळे गमाविण्याची भीती तरूणांमध्ये निर्माण झाली आहे.

( हेही वाचा : मुंबईत नायलॉन मांजावर १० फेब्रुवारीपर्यंत बंदी)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सामान्य प्रशासन विभागाच्या मागणीपत्रानुसार माहिती व जनसंपर्क विभागाकडील उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी व माहिती अधिकारी या वर्ग-१ व वर्ग-२ पदांची जाहिरात क्र.१२९, १३० व १३१ ही ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रसिध्द केली आहे. या सर्व पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत २३ जानेवारी २०२३ आहे. मागील दहा वर्षात भरल्या गेल्या नसतील त्यापेक्षा कित्येक पट जागांसाठी यावेळी सरळसेवा भरती निघाली आहे. मात्र सदर भरती प्रक्रियेतील जाहिरातीत स्पष्टपणे पत्रकारितेतील पदवी नमूद केले असतांनाही उमेदवार जेव्हा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जातो तेव्हा त्याला ‘आपल्याकडे सदर पदांसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता नसल्यामुळे अर्ज करण्यास पात्र नाहीत’ असा संदेश येतो. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करता येत नाही. पत्रकारितेची बॅचलर व डिप्लोमा ही डीग्री घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येत आहे. मात्र पत्रकारिता व जनसंपर्क विषयात ख्यातनाम विद्यापीठातून कला पारंगत पदवी (पदव्युत्तर पदवी) घेतलेले विद्यार्थी अपात्र ठरत आहेत.

राज्यातील सर्व प्रमुख शासकीय आस्थापना, सर्व विद्यापीठे, महानगरपालिका, सिडको, महावितरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, जिल्हा परिषद, वनविभाग, समाज कल्याण, शासकीय व निमशासकीय महामंडळे तसेच खुद्द माहिती व जनसंपर्क विभागातील संचालक, जिल्हा माहिती अधिकारी व माहिती अधिकारी हे पदे सरळसेवेने भरतांना पत्रकारितेतील पदव्युत्तर पदवीला प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. पत्रकारितेतील उच्च गुणवत्तेच्या तरतूदींशी कोठेही तडजोड झालेली दिसून येत नाही.

यावेळी मात्र लोकसेवा आयोगाच्या ऑनलाईन प्रक्रियेत तूलनेने सोप्या असलेल्या मुक्त विद्यापीठातून घरबसल्या सहज प्राप्त करून घेता येणाऱ्या बॅचलर (बी.जे) व डिप्लोमा या पदव्यांना महत्त्व दिलेले दिसून येते. ख्यातनाम विद्यापीठातून नियमितपणे प्राप्त केलेल्या कला पारगंत (पदव्युत्तर पदवी) धारकांस जर या पदांसाठी अर्ज करता येत नसतील तर माहिती प्रशासनात तुलनेने कमी पात्रता व ज्ञान असलेल्या अधिकाऱ्यांचा शिरकाव होऊ शकतो. हे निश्चित राज्याच्या प्रगतीसाठी भूषणावह नाही. अशी भावना पत्रकारितेतील पदव्युत्तर पदवीधारक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. पदव्युत्तर पदवीधारकांचे अर्ज स्वीकृत करण्याबरोबर ऑनलाईन अर्ज भरण्यास तात्काळ मुदतवाढ देण्यात यावी. अशी मागणी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग व सामान्य प्रशासन विभागाकडे केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.