महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) स्पर्धा परीक्षा – २०२४ ही परीक्षा १ डिसेंबर २०२४ या दिवशी झाली. या परीक्षेत महिलांसाठी ११० गुणांवर कट ऑफ लागला, पण या परीक्षेत १९४ गुण मिळालेल्या विद्यार्थिनीचे कट ऑफ लिस्टमधून नाव गायब झाले. MPSC चा हा भोंगळ कारभार समोर आला आहे. विशेष म्हणजे MPSC आता या विद्यार्थिनीची साधी तक्रारीही ऐकून घेत नाही.
पृथा पाटील असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. तिचा आसन क्रमांक MW009039 आहे. या परीक्षेचा निकाल १२ मार्च २०२५ या दिवशी लागला. तसेच सुधारित निकाल २९ मार्च २०२५ ला लागला. या परीक्षेत महिलांसाठी ११० गुणांवर कट ऑफ लागला. या परीक्षेत पृथा पाटील या विद्यार्थिनीला १९४.६२५ गुण मिळाले. मात्र निकाल जाहीर झाल्यावर पृथाचे नाव गुणवत्ता यादीत आले नाही. पृथाने हा सगळा प्रकार बेलापूर येथील MPSC च्या कार्यालयात जाऊन लेखी पत्राद्वारे कळवला. तसेच मेन्स परीक्षेसाठी अर्ज भरण्याचा दिनांक ६ एप्रिल २०२५ या दिवशी आहे. त्याआधीच आपल्या तक्रारीची दखल घेण्यात यावी, अशी विनंती पृथा हिने केली. मात्र १ एप्रिल उजाडला तरी MPSC ने याची दखल घेतलेली नाही.
(हेही वाचा Waqf Amendment Bill : वक्फ दुरुस्ती विधेयकाला अजमेर दर्गा आणि केरळमधील पाद्रींच्या संघटनेचा पाठिंबा)
पृथा ही डहाणू येथे राहते. तिने तिच्या वडिलांसोबत मागील १५ दिवसांत तीन वेळा बेलापूर येथे MPSC च्या कार्यालयात चकरा मारल्या. आता तर त्यांना कार्यालयाच्या स्वागतकक्षातूनच परत पाठवण्यात आले. त्यांच्या तक्रारीचे काय केले हे सांगण्याची साधी तसदीही घेतली जात नाही. पृथा ही दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात चालवल्या जात असलेल्या स्पर्धा परीक्षेच्या वर्गातील विद्यार्थिनी आहे. जर मेन्सच्या परीक्षेचा अर्ज भरण्याच्या मुदतीआधी पृथाला न्याय मिळाला नाही तर तिची वर्षभराची मेहनत वाया जाणार आहे अर्थात तिचे वर्ष वाया जाणार आहे. MPSC कडून वारंवार भोंगळ कारभार होत असतो. विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करतात, वर्षभर जीव ओतून अभ्यास करतात आणि परीक्षेच्या निकालात त्यांच्यावर अन्याय केला जातो. ही दुर्दैवी बाब आहे.