MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; नवा अभ्यासक्रम २०२५पासून लागू होणार

148

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) मुख्य परीक्षा पद्धतीमध्ये बदल केला होता. या नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी यंदा नाही तर २०२५ पासून करावी, अशी मागणी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. यासाठी गेल्या चार दिवसांपासून एमपीएससीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते. आता विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला यश आले असून नव्या अभ्यासक्रमाचा अखेर तिढा सुटला आहे. नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होणार असल्याची माहिती एमपीएससीच्या अधिकृत ट्वीट खात्यावरून देण्यात आली आहे. या महत्त्वाच्या निर्णयानंतर पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी जल्लोष केला आहे.

आयोगाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचे स्वागत आहे. आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत मी स्वतः फोनवरून चर्चा केली होती. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चर्चा केली होती. शासन देखील विद्यार्थ्यांच्या भूमिकेशी सहमत होते. आणि म्हणून एकंदरीत जी काही परिस्थिती निर्माण झाली होती, त्यानंतर आम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला विनंती केली होती. त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे आम्हाला याच्यामध्ये राजकीय श्रेय घ्यायचे नव्हते आणि त्याची आवश्यकताही नाही. परंतु काही लोकं त्यांच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या अडून राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत होते. खरं म्हणजे हा जो नवीन अभ्यासक्रमाचा निर्णय पूर्वीच्या महाविकास आघाडीच्या सरकारने घेतला होता, तरी सुद्धा या विषयाला ज्या पद्धतीने नवीन सरकारसोबत जोडत होते. पण आम्ही विद्यार्थ्यांची भावना लक्षात घेऊन सकारात्मक भूमिका घेतली.’

(हेही वाचा – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील ‘सर्वोच्च’ सुनावणी संपली; पुढील सुनावणी २८ फेब्रुवारीला)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.