MPSC च्या विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ गुरुवारी शरद पवारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार होते. मात्र ही भेट रद्द करण्यात आली आहे. गेल्या ४ दिवसांपासून MPSC च्या विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन सुरू आहे. नवा अभ्याक्रम २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
( हेही वाचा : भगूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे म्युझियम उभारण्याचा राज्य सरकारचा संकल्प)
आंदोलन मागे घेणार नाही…
MPSC च्या विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होते. मागच्या चार दिवसांपासून विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन सुरू आहे. जोवर लिखित आदेश किंवा MPSC मार्फत अधिकृत सूचना जाहीर करण्यात येत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा अवलंबला आहे. आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आमच्या मागणीची अधिकृत नोटीस काढल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी यावेळी मांडली आहे.
तीन आठवडे उलटले तरीही निर्णयाची अंमलबजावणी नाही
दरम्यान जानेवारीच्या अखेरिस विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत सरकारने नव्या परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी पुढे ढकलली होती. मात्र हा निर्णय तीन आठवडे उलटले तरीही या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत.