राज्यातील एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शेकडो विद्यार्थ्याना मागील दीड वर्षांपासून नियुक्ती देण्यात आलेली नाही. या भोंगळ कारभाराला कंटाळून अखेर स्वप्नील लोणकर या एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्यानंतर मोठा गदारोळ माजला. यामुळे नाराज एमपीएससी विद्यार्थी पुन्हा एकदा पुणे येथे रस्त्यावर उतरले, तसेच आत्महत्या करण्यास परवानगी द्या, अशी धक्कादायक मागणी करू लागले.
सरकारच्या वेळकाढू धोरणाचा विरोध!
पुणे येथील एमपीएससी आंदोलनातील बहुतांश विद्यार्थी एमपीएससी उत्तर्ण झाले होते आणि सरकारकडून नियुक्ती होईल, या प्रतिक्षेत असलेले होते. महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या परिक्षांचा १९ जून २०२० रोजी निकाल लागल्यानंतर ४१३ उमेदवारांची निवड झालेली आहे. त्यानंतर २ महिन्यांत या नियुक्त्या होणे अपेक्षित होते. मात्र, सरकारने त्या न केल्याने ९ सप्टेंबर २०२० च्या मराठा आरक्षणाबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कचाट्यात या नियुक्त्या सापडल्या. ५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यावर इतर नियुक्त्या देण्याचा उल्लेख केला. त्यानंतर २ महिने उलटून गेल्यानंतरही राज्य सरकारने त्यावर अद्याप निर्णय घेतला नाही. हे सर्व गट – अ पदी निवड झालेले अधिकारी आहेत. त्यामुळे सरकाच्या वेळकाढू धोरणाला कंटाळून हे अधिकारी आता रस्त्यावर उतरले.
(हेही वाचा : प्रीतम मुंडेंना मंत्रीपद न दिल्याबद्दल काय म्हणाल्या पंकजा ताई?)
नैराश्येच्या गर्तेत सापडले विद्यार्थी!
एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही शेकडो विद्यार्थी सध्या सरकारकडून नियुक्ती मिळेल या प्रतीक्षेत आहेत. त्यातील अनेक विद्यार्थी सध्या मिळेल ते काम करत आहेत. कुणी भाजी विकते तर कुणी हमालीचे काम करत आहे. कारण यातील अनेक जण हे गरीब घरातील आहेत. त्यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी दुसरे साधन नाही. कठोर परिश्रम घेऊन हे विद्यार्थी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले, मात्र त्यांना सरकार नियुक्ती देत नसल्याने त्यांच्यामध्ये नैराश्येचे वातावरण निर्माण झाले आहे.
Join Our WhatsApp Community