राज्यातील नागरी सेवांसाठी स्पर्धा परीक्षा घेणा-या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून लवकरच उत्तरपत्रिकांच्या तपासणीसाठी डिजिटल मूल्यांकन पद्धतीचा वापर केला जाणार आहे. झटपट आणि अचूक निकालासाठी ही पद्धत अवलंबण्यात येईल असे आयोगाकडून सांगण्यात येत आहे. त्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून पात्र कंपनीला काम देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अचूक आणि जलद मूल्यांकनासाठी निर्णय
सध्या एमपीएससीकडून घेण्यात येणा-या स्पर्धा परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची मूल्यांकन पद्धत ही पारंपारिक आहे. त्यामुळे परीक्षांचे निकाल लागण्यास विलंब होतो. तसेच काही त्रुटी राहण्याचा देखील संभव असतो. त्यामुळे ही पद्धत बदलून डिजिटल मूल्यांकन पद्धत सुरु करण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला आहे.
(हेही वाचाः ‘जाड आहेस, जिमला जा…’ असं महिलेला सांगणं बॉसला पडलं महागात! द्यावे लागले 18 लाख)
कसे होणार मूल्यांकन?
- उमेदवारांच्या उत्तरपत्रिका स्कॅन होऊन त्याची एक पीडीएफ फाईल तयार करण्यात येईल.
- अचूक उत्तरांची माहिती एका सॉफ्टवेअरमध्ये संग्रहित असेल
- उत्तरपत्रिका तपासताना काही त्रुटी राहिल्यास त्याची माहिती लगेच मिळेल
- डिजिटल मूल्यांकनामुळे उमेदवारांना अचूक गुण देण्यास मदत होईल
- प्रत्येक परीक्षार्थीला त्याच्या उत्तरपत्रिकेची पीडीएफ कॉपी त्याच्या एमपीएससी अकाऊंटवर पाठवण्यात येईल
- यामुळे विद्यार्थ्यांचा देखील पुनर्मूल्यांकनासाठीचा वेळ आणि खर्च वाचेल