मृत्यूपासून वाचवणारे हे आहेत ‘मृत्युंजय दूत’! काय आहे कामगिरी?

या मृत्युंजय दूतांना विशेष प्रशिक्षण दिले गेले असून, त्यांना स्ट्रेचर, स्थानिक रुग्णालयाचे फोन नंबर, रुग्णवाहिकांचे फोन नंबर दिले गेले आहेत.

राज्य महामार्गावर होणाऱ्या अपघातात जखमी होणाऱ्यांना वेळीच मदत मिळावी म्हणून राज्यभरातील महामार्गावर तैनात करण्यात आलेल्या ‘मृत्युंजय दूतां’कडून ३१ मे पर्यंत ३२८ जणांचे प्राण वाचवण्यात आले आहेत. अपघात झालेल्या ठिकाणी तासाभरात घटनास्थळी मृत्युंजय दूत दाखल होऊन, जखमींना वैद्यकीय मदत मिळवून देण्याचे काम करत आहेत.

५ हजार दूतांचे जाळे

राज्यातील महामार्गांवर होणाऱ्या अपघातानंतर वेळीच वैद्यकीय मदत मिळत नसल्यामुळे, अनेकांना प्राण गमवावे लागत होते. अपघातग्रस्तांना ताबडतोब वैद्यकीय मदत मिळावी, म्हणून राज्य महामार्ग पोलिसांकडून राज्यभरातील महामार्गावर ‘मृत्युंजय दूत’ ही संकल्पना १ मार्च पासून राबवण्यात आली आहे. राज्यभरात असलेल्या राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत असलेल्या गावातील स्थानिक ग्रामस्थ, ढाबे व पेट्रोल पंपचे कर्मचारी, आसपासचे डॉक्टर यांना विशेष प्रशिक्षण देऊन एकूण ५०१२ मृत्युंजय दूतांचे जाळे संपूर्ण राज्यभरात तयार केले आहे.

(हेही वाचाः एसटीकडे उरला फक्त ‘इतकाच’ मदत निधी! कशी देणार अपघातग्रस्तांना भरपाई?)

अशी करतात मदत

राज्यभरात होणाऱ्या रस्ते अपघाताच्या ठिकाणी तासाभरातच हे मृत्युंजय दूत दाखल होऊन, जखमींना वैद्यकीय मदत पुरवण्याचे काम करतात. मागील तीन महिन्यांत म्हणजेच १ मार्च ते ३१ मे पर्यंत या मृत्युंजय दूतांनी १५३ रस्ते अपघातग्रस्तांच्या ठिकाणी वेळेवर दाखल होऊन, जखमी झालेल्या ३२८ जणांचे प्राण वाचवले आहेत.

जीव वाचण्यास होते मदत

राज्य वाहतूक महामार्ग पोलिस विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजीपी) डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात ‘मृत्युंजय दूत ’ म्हणून एकूण ५०१२ स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले आहेत. हे स्वयंसेवक अपघातग्रस्तांना त्वरित मदत देत आहेत. महाराष्ट्रात ९८ राष्ट्रीय महामार्ग व ३७८ राज्य महामार्ग आहेत. नाशिक, पुणे, अहमदनगर, सोलापूर आणि लातूर येथे सर्वाधिक प्राणघातक अपघात घडले आहेत. रस्ते अपघातांच्या आकडेवारीचा हवाला देताना डॉ. उपाध्याय म्हणाले, देशभरात दरवर्षी दीड लाखाहून अधिक लोक रस्ते अपघातात आपला जीव गमावतात. जर एका तासामध्ये वैद्यकीय उपचार घेतल्यास अपघातग्रस्तांपैकी ६२ टक्क्यांहून अधिक लोकांचे जीव वाचू शकतात, असे उपाध्याय म्हणाले.

(हेही वाचाः बहिराम पाड्यानंतर मालवणीत इमारत कोसळली! ११ जणांचा मृत्यू )

दिले जाते प्रशिक्षण

सध्या अपघातग्रस्ताला रुग्णालयात दाखल करण्यास सुमारे ९० मिनिटे ते दोन तास लागतात. स्थानिक गावकरी, हॉटेल, पेट्रोल कर्मचारी हे सर्वात अगोदर मदतीसाठी धाऊन जातात, या मृत्युंजय दूतांना विशेष प्रशिक्षण दिले गेले असून, त्यांना स्ट्रेचर, स्थानिक रुग्णालयाचे फोन नंबर, रुग्णवाहिकांचे फोन नंबर दिले गेले असल्याची माहिती, अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजीपी) डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here