राज्यभरातील बत्ती बुधवारपासून गूल होण्याची शक्यता आहे. महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात कर्मचा-यांनी 3 दिवसांचा संप पुकारला आहे. तर वीज कर्मचारी संपावर मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला आहे. सरकारच्या इशा-यानंतरही संपावर जाणारच, असा ठाम निर्धार संपकरी कर्मचा-यांनी व्यक्त केला आहे.
संपाचा कोयना वीजनिर्मिती प्रकल्पाला फटका
राज्यातील वीज कर्मचारी संपाचा कोयना वीजनिर्मीती प्रकल्पाला फटका बसला आहे. कर्मचा-यांअभावी कोयना प्रकल्पातील 36 मेगावॅटचे दोन युनिट बंद आहेत. कोयना धरणाच्या पायथा वीज प्रकल्पातील 35 कर्मचारी संपामध्ये सहभागी आहेत.पोकळी वीजनिर्मीती प्रकल्पातीलही कर्मचारी संपामुळे कामावर आलेले नाहीत. कर्मचारी संपामुळे कोयना प्रकल्पातील वीजनिर्मितीवर मोठा परिणाम होऊ शकतो.
( हेही वाचा: वीज कर्मचा-यांचा संप: राज्यातील अनेक जिल्हे अंधारात; कुठे काय परिस्थिती जाणून घ्या )
रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागात बत्ती गूल
वीज कर्मचारी संपावर गेल्याचा फटका राज्यातल्या ग्रामीण भागातही बसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागात बत्ती गूल झाली आहे. रत्नागिरी शहर वगळता राजापूर, लांजा, संगमेश्वर, चिपळूण, खेड, दापोली, गुहागर, मंडणगड या तालुक्यातील वीज गेली आहे. त्यामुळे अनेक व्यवसायावर याचा परिणाम दिसून येत आहे.
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील वीज निर्मीतीला फटका
वीज कर्मचा-यांच्या संपाचा चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील वीज निर्मितीला फटका बसला आहे. 210 मेगावॅट क्षमतेचे युनिट 4 आणि 500 मेगावॅट क्षमतेचे युनिट 5 बंद पडले. युनिट 4 मध्ये ए्अर हीटरची समस्या उद्भवली आहे, तर युनिट 5 मध्ये कोळशाची राख बाहेर निघण्याच्या प्रक्रियेत बिघाड आल्याने दोन्ही युनिट करण्यात बंद करण्यात आले आहेत.