समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी MSRDC उभारणार १५ पोलीस ठाणी

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ७०१ किलोमीटर लांबीच्या या द्रुतगती महामार्गावर आता पोलीस ठाणी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि वाहतुकीवर नियंत्रण या उद्देशाने या पोलीसा ठाण्यांची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) पुढाकार घेतला आहे. यामागे समृद्धी महामार्गावरून प्रवास सुखकर व्हावा तसेच आपात्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी यामागील उद्देश आहे.

( हेही वाचा : बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान मिळणार?)

५० किमी अंतरावर १५ सुरक्षा पोलीस ठाणी

प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेत समृद्धी महामार्गालगतच महामार्ग सुरक्षा पोलीस ठाण्यांची उभारणी करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे. दर ५० किमी अंतरावर १५ महामार्ग सुरक्षा पोलीस ठाण्यांची उभारणी केली जाणार आहे. नागपूर आणि मुंबई या दोन शहरांना जोडणारा समृद्धी महामार्ग दहा जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांमधून जाणार आहे. ताशी १२० किमी या वेगाने या महामार्गावरून वाहने धावतील.

विशेष सुविधा

पोलीस ठाण्यांव्यतिरिक्त समृद्धी महामार्गावर २१ क्विक रिस्पॉन्स व्हेईकल महामार्गावर तैनात करण्यात येणार आहेत. नागरिकांपर्यंत मदत पोहोचावी यासाठी टोलनाक्यांवर वाहने तैनात असतील. एमएसआरडीसीने मार्गावर २१ रुग्णवाहिकांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या १५२ सुरक्षा अधिकाऱ्यांना एमएसआरडीसीने महामार्ग पोलिसांच्या मदतीसाठी नियुक्त केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here