येत्या वर्षात एसटीच्या अपघाताचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट

राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या निर्देशानुसार व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटीमध्ये ११ जानेवारी ते २५ जानेवारीदरम्यान सुरक्षितता मोहीम राबवली जाणार आहे. एसटी चालकाचे प्रबोधन, चर्चा आणि कृतिशील कार्यवाही या माध्यमातून एसटी बसेसच्या अपघाताचे प्रमाण कमी  करणे हा रस्ते सुरक्षा अभियानाचा मुख्य उद्देश आहे. महामंडळावरचा प्रवाशांचा विश्वास यामुळे अधिक वृद्धिंगत होण्यास मदत होईल. असे प्रतिपादन एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी एसटीच्या रस्ते सुरक्षा अभियानाची सुरुवात करताना केले.

( हेही वाचा : शिवसेनेचा कारभार पक्षाच्या घटनेनुसारच चालतो का; ठाकरे गटाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह)

या प्रसंगी बोलताना चन्ने म्हणाले की, चालक हा वाहनाचा मेंदू असतो जसे शरीराचे नियंत्रण आपल्या मेंदूद्वारे होते त्याप्रमाणे  वाहनाचे नियंत्रण चालकाद्वारे होते. त्यामुळे रस्त्यावरील परिस्थिती कितीही आव्हानात्मक असली तरीही स्थितप्रज्ञ राहून आपल्या वाहनावर नियंत्रण मिळविण्याचे  कौशल्य चालकाने आपल्या अंगी बाळगणे आवश्यक आहे. आपल्यावर गाडीतील ५० प्रवाशांची जबाबदारी असून आपल्या व्यक्तिगत अडचणीचे प्रतिबिंब कामगिरीवर होऊ नये याची दक्षता चालकाने घ्यावी. याबरोबरच महामंडळातील यांत्रिकी कर्मचाऱ्यांनी चालकाला दिल्या जाणाऱ्या बसेस तांत्रिक दृष्ट्या निर्दोष असतील त्याची खात्री करूनच त्या मार्गस्थ कराव्यात. विशेष म्हणजे कामगिरीवर जाणाऱ्या चालकाची मानसिकस्तिथी चांगली राहील, असे वर्तन त्यांच्या सहकाऱ्यांकडून व वरिष्ठ अधिकाऱ्याकडून होणे अपेक्षित आहे.

या सुरक्षितता मोहिमेच्या पार्श्वभूमीवर “प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी, वाहतुकीच्या नियमांचे पालन, उत्तम शरीर प्रकृती आणि मन:स्वास्थ्य” या चतुसुत्रीचे पालन करीत एसटीच्या चालकांनी यंदाच्या वर्षांमध्ये सर्वसामान्य जनतेला अपघात विरहित सेवा देण्याचे आवाहन एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here